घरठाणेशहर फेरीवाला समितीच्या निवडणुकीची कामगार खात्याकडे शिफारस करणार

शहर फेरीवाला समितीच्या निवडणुकीची कामगार खात्याकडे शिफारस करणार

Subscribe

महापालिका आयुक्तांची समितीच्या सभेत माहिती, फेरीवाला यादी अद्ययावत करण्याचे काम सुरूच राहणार

ठाणे शहरातील नोंदणीकृत फेरीवाल्यांची अंतिम यादी आता प्रसिध्द झाली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पुढे जाण्याच्या दृष्टीने शहर फेरीवाला समितीची निवडणूक घेण्याची शिफारस कामगार आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. तसेच, फेरीवाला यादी अद्ययावत करण्याचे काम सातत्याने सुरू राहील, अशी माहिती आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत दिली. फेरीवाला क्षेत्र कोणते, कुठे कारवाई होणार नाही, नोंदणीपत्र कधी मिळणार याबद्दल फेरीवाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम आहे. तो दूर करण्यासाठी फेरीवाला धोरणाप्रमाणे चौथ्या टप्प्यातील कार्यवाही करण्याची आता गरज आहे. त्यानुसार, शहरातील १ हजार ३६६ नोंदणीकृत फेरीवाल्यांच्या मतदानातून नवीन शहर फेरीवाला समिती लवकरात लवकर निवड करणे आवश्यक असल्याचे मत आयुक्त बांगर यांनी मांडले. तशी शिफारस आता कामगार आयुक्तांकडे करण्यात येईल. कामगार आयुक्त निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करतील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

शहर फेरीवाला समितीची सभा बुधवारी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात झाली. या सभेस, उपायुक्त मारुती खोडके, जी.जी. गोदेपुरे, तसेच समितीच्या ३० सदस्यांपैकी १७ सदस्य उपस्थित होते. या बैठकीत, समिती सदस्यांनी फेरीवाला नोंदणीपत्र मिळण्यातील अडचणी मांडल्या. दोन वर्षांत सर्वेक्षण झालेले नसल्याने फेरीवाल्यांची फेर सर्वेक्षणाची मागणी असल्याचेही सदस्यांनी बैठकीत सांगितले. अंतिम यादीतील काही नावांविषयी आक्षेप काही सदस्यांनी नोंदवला. फेरीवाल्यांच्या तुलनेत नोंदणीकृत फेरीवाल्यांची संख्या खूप कमी असल्याचे मत सदस्यांनी बैठकीत मांडले. या सर्व सूचनांचा आढावा घेतला जाईल. त्यातील नियमाप्रमाणे असलेल्या गोष्टींची पूर्तता केली जाईल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. सर्वेक्षण, प्रारुप यादी, अंतिम यादी ही प्रक्रिया झाल्यानंतर आता निवडणूक घेण्याची वेळ आलेली आहे. निवडून आलेली समिती शहर फेरीवाला आराखड्यानुसार, प्रभाग क्षेत्रनिहाय फेरीवाला क्षेत्रांची यादी तयार करेल. त्यामुळे नोंदणीकृत फेरीवाल्यांना त्यांच्या जागेची खात्री मिळेल. त्यातून सध्याची संभ्रमावस्था दूर होईल, असे आयुक्त बांगर म्हणाले.
महापालिकेने फेरीवाल्यांना सन २०१८मध्ये दिलेल्या काही नोंदणीपत्रांची मुदत २०२३ मध्ये संपत आहे. त्यांना मुदतवाढ देण्याचा तसेच, शुल्कात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
स्टेशन, तलावपाळी या परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. ही दोन्ही क्षेत्रे मोकळी ठेवणे नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक आहे. तेथील स्थानिक फेरीवाल्यांसाठी कोणती व्यवस्था करायची यावर पालिका प्रशासन स्वतंत्रपणे विचार करत आहे, अशी माहितीही आयुक्त बांगर यांनी दिली.

- Advertisement -

फेरीवाल्यांच्या  हा रोजीरोटीचा व्यवसाय आहे, शिवाय, नागरिकांचीही ती गरज आहे. हे लक्षात घेऊन फेरीवाल्यांच्या क्षेत्राची आखणी केली जाईल. एकिकडे कारवाई सुरूच राहील, मात्र त्याचवेळी फेरीवाला धोरणाची अमंलबजावणी करून हितासाठीही काही पावले उचलली जातील, असे आयुक्त बांगर यांनी नमूद केले.
नोंदणीकृत फेरीवाल्यांबरोबरच इतरही फेरीवाले असतात. त्याच बरोबर, स्टेशनसारख्या परिसरात फेरीवाले, रिक्षावाले यांच्या गर्दीचा फायदा घेऊन अमली पदार्थांचे सेवन करणारे, जुगार खेळणारे अशा लोकांचा वावरही वाढत होता. प्रवाशांच्या दृष्टीने विशेषत: रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यातून निर्माण झाला होता. त्यामुळे स्टेशन परिसरात तातडीने कारवाई करून हा परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला. तसेच, पोलिसांनी बेशिस्त रिक्षाचालकांवरही कारवाई केली, असेही आयुक्त बांगर यांनी सांगितले.

फेरीवाला तिथे कचराकुंडी हवीच!

- Advertisement -

फेरीवाल्यांना कचरापेटी सक्तीची करावी, अशी सूचना समिती सदस्यांनी केली. त्यावर, या सूचनेची तत्काळ अमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्त  बांगर यांनी दिले. फेरीवाला मग तो अधिकृत असो की अनधिकृत त्याने त्याच्या गाडी शेजारी कचराकुंडी ठेवायला पाहिजे. शहर फेरीवाला समितीनेही त्यासाठी आवाहन करावे. त्यातून स्वच्छता राखली जाईल, सगळ्यांना शिस्त लागेल, असे आयुक्त बांगर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -