घरठाणेठाणे जिल्हा रुग्णालयातील १४ महिन्यांचे जेवणाचे बील थकले!

ठाणे जिल्हा रुग्णालयातील १४ महिन्यांचे जेवणाचे बील थकले!

Subscribe

रुग्णांना समतोल आहार, राजर्षी शाहू संस्थेवर उपासमारीची वेळ

कोरोना कालावधीत ठाणे जिल्हा विठ्ठल सायन्ना (सामान्य) शासकीय रुग्णालयातील रुग्णांना सणाला गोडधोड, बुधवारी अंडा करी, शुक्रवारी चिकन करी, दररोज अंड, दूध आणि शाकाहारी रुग्णांना पनीर… अशा चमचमीत पदार्थांची रेलचेल आहे. कोरोना रुग्णांना आजाराचा विचार करून समतोल आहार देणार्‍या सहकारी संस्थेचे १४ महिन्यांचे अद्यापही बील अदा झालेले नाही. यामुळे रुग्णांना तुपाशी ठेवणार्‍या राजर्षी शाहू नागरी सेवा सहकारी संस्थेवर (मर्यादित) उपाशी राहण्याची वेळ ओढवली आहे. या बिलाचा वनवास कधी संपणार याची वाट पाहण्यापलीकडे त्यांच्याकडे पर्याय दिसत नाही. दुसरीकडे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने ग्रँट न मिळाल्याने बिल अदा करण्यास उशीर होत असून ग्रँटचे पैसे आल्यावर ते बील अदा केले जाईल, असे कारण देत आहे.

जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या जेवणाचा ठेका राजर्षी शाहू नागरी सेवा सहकारी संस्थेकडे ( मर्यादित) आहे. दररोज १५० ते २०० रुग्णांना दोन वेळचे जेवण, चाय, नाश्ता दिला जातो. जेवणामध्ये डाळ-भात, भाजी, चपाती आदी पदार्थ दिले जातात. मात्र, कोविड रुग्णालय म्हणून विशेष दर्जा जिल्हा रुग्णालयाला मिळाल्यानंतर त्या कोरोना कालावधीत तेथे उपचारार्थ दाखल होणार्‍या रुग्णांना त्याप्रमाणे जेवण देण्यास सुरुवात झाली. जेवणातील ताटात नियमित जेवणाबरोबर अंडाकरी, चिकनकरी, पनीर हे खास मेनू दिले जातात. याशिवाय मधुमेह रुग्णांना त्यांच्या आहाराप्रमाणे जेवण दिले जाते.

- Advertisement -

प्रत्येक सणाला कधी शिरा, गुलाबजाम, लाडू यासारखे पदार्थ देण्यात येत आहे. हे पदार्थ आज सुद्धा दिले जातात. त्यातच जेवणाची प्लेट ही पुन्हा वापरात येणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यातच महागाईत अन्नधान्याच्या किमतीही वाढल्या. तसेच जेवण करणार्‍या कर्मचार्‍यांचे पगार वाढले. हा अतिरिक्त भुर्दंड सहन करत, रुग्णांना जेवणाची प्लेट नित्यनियमाने मार्च २०२० पासून आतापर्यंत दिली जात आहे. त्यातच पहिल्या लाटेत आणि दुसर्‍या लाटेत रुग्ण अचानक वाढले असले तरी नियमित प्लेटपेक्षा अतिरिक्त रुग्णांनाही त्याचप्रमाणे जेवण दिले गेले. त्यातच मागील १४ महिन्यांपासून बिल मिळाले नाही. त्यामुळे संस्थेवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. कोरोनापूर्वीही असेच जेवणाचे बिल थकले होते. ते १५ महिन्यांनी टप्प्याटप्प्याने मिळाले होते.

* प्रती रुग्णाच्या प्लेटमागे ३० रुपये वाढला खर्च
कोरोनामुळे जेवणाची प्लेट ही पुन्हा वापरात येत नसल्याने नष्ट होणार्‍या प्लेटचा वापर सुरू केला. याशिवाय महागाई वाढल्याने प्रति रुग्णाच्या जेवणाच्या प्लेटमागे ३० रुपये अतिरिक्त खर्च संस्थेच्या खांद्यावर पडला आहे.

- Advertisement -

‘कोरोना कालावधीत सेवा दिली जात आहे. मात्र, वेळेवर पैसे मिळत नाही, त्यातच महागाईने कंबरडे मोडले आहे. मागील १४ महिन्यांपासून लाखोंचे बिल न मिळाल्याने आता कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.’ – जनार्दन चांदणे, राजर्षी शाहू नागरी सेवा सहकारी संस्था (मर्यादित)

‘कोरोना कालावधीतील काही बिले देणे अद्यापही बाकी आहे. ही बिले ग्रँट न मिळाल्याने बाकी राहिली आहेत. त्यातच रुग्णालयातील रुग्णांना जेवण देणार्‍या संस्थेचेही बिल देणे बाकी आहे. ग्रँट मिळाल्यावर हे बील तात्काळ अदा केले जाईल.’- डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -