वनविभागाने साकारलेल्या नक्षत्रवनाची दुरवस्था

शहापूर तालुक्यातील मौजे कानविंदे येथे वन विभागातर्फे स्व. उत्तमराव पाटील वनउद्याची निर्मिती करण्यात आली आहे. १२.१० हेक्टर परीसरात सकारण्यात आलेल्या या नक्षत्रवनाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे.

शहापूर तालुक्यातील मौजे कानविंदे येथे वन विभागातर्फे स्व. उत्तमराव पाटील वनउद्याची निर्मिती करण्यात आली आहे. १२.१० हेक्टर परीसरात सकारण्यात आलेल्या या नक्षत्रवनाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. शहापूर तालुक्यात वन विभागाकडून पर्यटनाला चालना देण्यासाठी २०१५ -१६ मध्ये सामाजिक वनीकरणातंर्गत वन व वनोत्तर जमिनीवर स्व. उत्तमराव पाटील वनोद्यानाची संकल्पना साकारण्यात आली. गेली पाच वर्ष या ठिकाणी वन विभागामार्फत विविध विकास कामे करण्यात आली. परंतु सामाजिक वनीकरणाकडून हे उद्यान प्रादेशिक वन विभागाकडे हस्तांतरीत होण्यासाठी वेळ लागल्याने या उद्यानाची देखभाल अभावी प्रचंड दुरवस्था झाली आहे.

हे वन उद्यान आत्ताच प्रादेशिक विभागाकडे हस्तांतरीत झाला असून या ठिकाणी बरेच गवत वाढले होते. ते काढून उद्यानाची साफसफाई वन विभागाकडून काम सुरु आहे.
– वसंत घुले, उपवन संरक्षक, ठाणे

शासनाने चांगला हेतू बाळगून १२ हेक्टर परिसरात उपवनांची निर्मिती केली. तसेच या ठिकाणी विविध कामांसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. परंतू ही सर्व कामे मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करुनही अपूर्णच राहिली. केलेल्या कामात लहान मुलांसाठी बाग, खेळणी, ज्येष्ठांसाठी विश्रांती केंद्रे, फिरण्यासाठी पायवाटा आशा विविध संकल्पना घेऊन या उद्यानाची निर्मीती केली आहे. येथे विविध वनस्पती, फुल लागवड करण्यात आली आहे. मात्र निधी खर्च झाल्याचे सांगत सामाजिक वनीकरण विभागाने या वन उद्यानाकडे दुर्लक्ष केल्याने देखभाल व दुरुस्ती अभावी तसेच अपूर्ण विकास कामांमुळे सद्यस्थितीत या वनउद्यानाची प्रचंड दैनावस्था झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. अपूर्ण कामांमुळे हे वन उद्यान पर्यटकांसाठी खुले करता आले नाही. परिणामी लाखो रुपयांचा शासकीय निधी वाया गेल्याचे वास्तव समोर येत आहे.

या उद्यानाची दुरवस्था झाल्याचे आत्ताच समजले. माहिती घेवून हे उद्यान सुरु करण्यासाठी होणार्‍या दिरंगाईबाबत शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल.
– दौलत दरोडा, आमदार, शहापूर

हेही वाचा –

१ मार्च ते २८ मार्च पर्यंत होणार राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन?