घरठाणेकोरोनामुळे महाशिवरात्रीच्या उत्साहावर विरजण

कोरोनामुळे महाशिवरात्रीच्या उत्साहावर विरजण

Subscribe

तुंगारेश्‍वर पर्वताच्या तुंगारेश्‍वर फाटा आणि पारोळ येथील प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त

नववर्षाच्या सुरूवातीनंतर मोठा आणि पहिला सण म्हणून महाशिवरात्रीकडे पाहिले जाते. भगवान शिवशंकरांना स्मरण्याचा, त्यांना अभिषेक घालण्याचा हा दिवस. दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीला ठिकठिकाणी भाविकांचा अक्षरश: मळा फुलतो. वसईतील प्राचिन आणि ऐतिहासिक शिवमंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावणारे नागरिक, ठिकठिकाणी भरणारे यात्रोत्सव, यात्रोत्सवानिमित्त आयोजित केले जाणारे नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम असे चित्र यावर्षी कोरोना विघ्नामुळे कोठेही दिसून आले नाही.

तुंगारेश्‍वर पर्वतावर दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. सध्या लॉकडाऊन शिथील असल्याने कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करून भाविक मोठ्या प्रमाणात तुंगारेश्‍वर पर्वतावर दाखल होऊ शकतात. त्याहेतूने तुंगारेश्‍वर पर्वताच्या तुंगारेश्‍वर फाटा आणि पारोळ येथील प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे वसई तालुक्यातील श्रीक्षेत्र ईश्‍वरपुरी, वसई- पारनाका येथील ऐतिहासिक शिवमंदिर, पारोळ येथील प्राचिन शिवमंदिर, पापडी येथील श्री हरिहरेश्‍वर मंदिर, विरार फाटा येथील श्रीशिव पार्वती मंदिर, सातिवली येथील श्रीशिव मंदिर, विरार व नालासोपार्‍यातील प्रसिद्ध शिवमंदिरांच्या ठिकाणी कोरोना प्रादुर्भावामुळे भाविकांची तुरळक गर्दी दिसून आली.

- Advertisement -

वसई तालुक्यात अनेक जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. प्रामुख्याने उत्तर भारतीय नागरिकांची संख्या वसई-विरार व नालासोपार्‍यात मोठी आहे. या उत्तर भारतीयांच्या मोठ्या जल्लोषाचा, आनंदाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्रीनिमित्त उत्तर भारतीयांच्या जल्लोषाला पारावर उरत नाही. भगवान शंकराचे निस्सीम उपासक म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल. मात्र यंदा कोरोना विघ्नामुळे या नागरिकांच्या आनंदावर विरजण आले. वसई तालुक्यात प्रसिद्ध शिवालये आहेत. या शिवालयांच्या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे शिवालयांत सकाळपासूनच गर्दी कमी दिसून आली.

तुंगारेश्‍वर पर्वतावरील प्रसिद्ध धार्मिक ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत दरवर्षी संपन्‍न होतो. दरवर्षी दीड ते दोन लाख भाविक या महाशिवरात्रीनिमित्त तुंगारेश्‍वर पर्वतावर उपस्थित राहतात. यावर्षी भाविकांना तुंगारेश्‍वर पर्वतावर गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आला. पोलीस बंदोबस्त तुंगारेश्‍वर पर्वताच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर तैनात करण्यात आल्याने भाविकांना तुंगारेश्‍वर पर्वतावर प्रवेश करता आला नाही. त्यामुळे यंदा मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत तुंगारेश्‍वर पर्वतावरील श्री महादेवांना अभिषेक घालून षोडषोपचारे श्री महादेवांची पूजा करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -