सब रजिस्ट्रार कार्यालयात कोरोनाचे नियम पायदळी

कार्यालयातील सामान्य नागरिकांना कार्यालयाखाली उनपावसात एजंट्सची वाट पाहात उभे राहावे लागते तर एजंट्स कार्यालयात कुठेही कधीही वावरत असतात.

The coroner's rule in the sub-registrar's office was trampled
सब रजिस्ट्रार कार्यालयात कोरोनाचे नियम पायदळी

शासनाला लाखोंचा महसूल मिळवून देणाऱ्या दुय्यम निबंधक अर्थात सब रजिस्ट्रार कार्यालयांमध्ये एंजटांना साहेबांसमोर बसायला खुर्ची तर ज्यांच्या जीवावर महसूल मिळतो त्या सर्वसामान्य जनतेला मात्र कार्यालयातील जिन्याच्या धूळयुक्त फरशीवर किंवा खाली झाडाखाली ताटकळत उभे राहावे लागत आहे. विशेष म्हणजे कार्यालयात एजंट्सकडून सोशल डिस्टन्ससिंगचा बोजवारा उडत आहे. शिवाय मास्क, सॅनिटायझर वापरण्याबाबतही ढिसाळपणा होत आहे. कल्याण चिकनघर येथील सब रजिस्ट्रार कार्यालयात हा प्रकार होत आहे.मालमत्ता हस्तांतर कायदा १८८२ या कायद्यानुसार मालमत्तेची नोंदणी, रजिस्टर केली जाते. ज्या मालमत्तेची किंमत १०० पेक्षा अधिक आहे. अशा मालमत्तेची संबधित नोंदणी करणे अनिवार्य आहे. यातून शासनाला मुद्रांक शुल्क व नोंदणी फी च्या रुपाने महसूल मिळतो. कल्याण डोंबिवली परिसरात अशी ५ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत.

यामध्ये कल्याण चिकनघर, कर्णिक रोडवरील होलीक्राॅस हाॅस्पिटल जवळ, कल्याण पुर्व तिसगाव आणि डोंबिवली २ यांचा समावेश आहे.खरेदीखत, साठेकरार, कुलमुखत्यारपत्र, वाटणी पत्र, हक्कसोड पत्र, गहाणखत, लिव्ह अॅड लायसन्स, भाडेपट्टी विकास करार आदी दस्तऐवज या कार्यालयात नोंदणी केले जातात. यातून मिळणारे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी यातून शासनाला लाखोंचा महसूल मिळतो. कल्याण चिकनघर येथील सबरजिस्ट्रार कार्यालयांमध्ये दररोज (कोरोना काळ) अपवाद वगळता कमीत कमी ४० ते ५० आणि जास्तीत जास्त १०० कागदपत्रांची नोंदणी होते. मालमत्तेच्या मुल्यांकनानुसार मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी आकारली जाते.

 

यासाठी खरेदी विक्री करणारे आणि साक्षीदार यांना कार्यालयात यावे लागते. ठाणे जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे दुय्यम निबंधक असतात.बदलापूर व मुरबाड हा भाग ग्रामीण भागात मोडतो. तसेच कल्याण मधील चिकनघर हे कार्यालय कायम वर्दळीचे असते. या कार्यालयाची दुरवस्था झालेली आहे. पहिल्या मजल्यावर सबरजिस्ट्रार आणि क्लार्क समोरील खोल्यांमध्ये नोंदणी झालेले दस्तऐवज रद्दीच्या भंगार गोडाऊन सारखे झाले आहे. तर या कार्यालयाची ओळख दर्शवणारा फलक जमीनीवरच धूळखात पडला आहे.

कार्यालयातील सामान्य नागरिकांना कार्यालयाखाली उनपावसात एजंट्सची वाट पाहात उभे राहावे लागते तर एजंट्स कार्यालयात कुठेही कधीही वावरत असतात. कल्याण चिकनघर रजिस्ट्रार कार्यालयासमोरच कचरा डेपो आहे. याची दुर्गंधी सर्वत्र पसरलेली, स्वच्छतेचा अभाव, अस्ताव्यस्त पडलेले दस्तऐवज, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह यांचा अभाव, वयोवृद्ध, अपंग यांची मोठी गैरसोय आदी प्रश्नाकडे कार्यालय प्रमुखांचे आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

स्वच्छता नसेल कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात असतील तर संबंधित सब रजिस्ट्रार यांना कडक सूचना देण्यात येतील.
– दिपक आकडे, कल्याण तहसीलदार