Homeठाणेठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणास 2 फेब्रुवारीपर्यत मुदतवाढ

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणास 2 फेब्रुवारीपर्यत मुदतवाढ

Subscribe

सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापालिकेचे आवाहन

ठाणे : महाराष्ट्रातील मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीचे काम महाराष्ट्र शासनातर्फे राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविण्यात आले आहे. यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण शहरी भागातील मराठा समाज व खुल्या समाजातील नागरिकांचे सर्वेक्षण 23 जानेवारी 2024 पासून सुरू झाले आहे. संपूर्ण शहरात हे काम सुरू असून या कामाची मुदत वाढविण्यात आली असून 2 फेब्रुवारी 2024 पर्यत हे काम सुरू राहणार आहे. सदरचे सर्वेक्षण हे शासकीय यंत्रणेमार्फत राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या सॉफ्टवेअर ॲप्लीकेशनद्वारे करण्यात येत आहे.

यानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे नागरिकांचे सर्वेक्षण महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असून याकामी २५० पर्यवेक्षक व सुमारे ४००० प्रगणक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संबंधित प्रभाग कार्यालयाकडील सहायक आयुक्त हे वॉर्डस्तरीय नोडल ऑफिसर व कार्यालयीन अधीक्षक हे सहाय्यक वॉर्डस्तरीय नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे अधिनस्त प्रभाग स्तरावरील सर्वेक्षणाचे कामकाज केले जात आहे.

शासनाच्या वतीने महानगरपालिकेने नियुक्त केलेले प्रगणक हे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कुटुंबांचे मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार करीत आहे. संपूर्ण शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण व्हावे यासाठी या कामास 2 फेब्रुवारीपर्यत मुदतवाढ देण्यात आली असून  सर्वेक्षणास ठाणेकर नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.  सर्वेक्षणाकरिता नागरिकांसाठी महानगरपालिकेमार्फत हेल्पलाईन सुविधा (८६५७८८७१०१) उपलब्ध करून देण्यात आली असून या सुविधेद्वारे नागरिक सर्वेक्षणाबाबत काही सूचना असल्यास यावर नोंद करु शकतील.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार  राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने सुरू असलेल्या या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.