खारेगाव परिसरातील खेळाडूंचे मैदानाचे स्वप्न अखेर साकार होणार

कळवा खारेगाव परिसरात खाडी किनारी व सखल भागात अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे उभी राहील्याने या परिसरातील वेगवेगळ्या खेळाचा सराव करणारे अनेक खेळाडू व विद्यार्थ्यांना खेळायला हक्काचे मैदान उपलब्ध नाही. कळवा परिसरात छोटेखानी गावदेवी मैदान व मनीषा नगरमधील सायबा मैदान तर विटाव्यात पर्‍याचे मैदान आहे

कळवा खारेगाव परिसरात खाडी किनारी व सखल भागात अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे उभी राहील्याने या परिसरातील वेगवेगळ्या खेळाचा सराव करणारे अनेक खेळाडू व विद्यार्थ्यांना खेळायला हक्काचे मैदान उपलब्ध नाही. कळवा परिसरात छोटेखानी गावदेवी मैदान व मनीषा नगरमधील सायबा मैदान तर विटाव्यात पर्‍याचे मैदान आहे. परंतु येथे वर्षभर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने खेळाडूंना उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या खेळाडूंना खेळाचा सराव करण्यासाठी खाडीच्या पलीकडे ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम अथवा सेंट्रल मैदानावर जावे लागते. तसेच ठाणे महापालिकेच्या प्राथमिक शाळांना क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी दरवर्षी विद्यार्थ्यांना ठाण्यात घेऊन जावे लागते. या परिसरात मोठे ’स्पोर्टकॉम्प्लेक्स’ व्हावे. म्हणून कळव्यातील दिवंगत नगरसेवक मुकुंद केणी यानी प्रयत्न केले होते. त्या ’स्पोर्टकॉम्प्लेक्स’चे कामही संथगतीने सुरू आहे. म्हणून या परिसरात मोठे खेळाचे मैदान व्हावे. यासाठी खारेगाव येथील नगरसेवक उमेश पाटील यांनी ठाणे महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. आता त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून विकास आराखड्यातील सेक्टर ८ मधील नियोजित बस स्थानकाचे आरक्षण बदलून या ठिकाणी खेळाचे मैदान आता प्रस्तवित करण्यात आले आहे.

या परिसरात मोठे खेळाचे मैदान व्हावे म्हणून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता या महासभेत त्यासाठी मंजूरी मिळाल्यास परिसरातील खेळाडूंना त्याचा खूप फायदा होईल.
– उमेश पाटील, स्थानिक नगरसेवक, खारेगाव

गेल्या महिन्यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेने विकास आराखड्यातील तीन भुखंडाचे आरक्षणबदलण्यासंदर्भात मागील महिन्यात महापालिकेत बैठक घेतली होती. त्यांनी केलेल्या सुचनेनुसार मुंब्र्यात प्रभाग समिती कार्यालय, एज्युकेशन हब व कळव्यात खेळाचे मैदान हे निर्णय घेण्यात आले. ते प्रत्यक्षात साकारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून येत्या १९ मार्चच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. त्यानुसार खारेगाव नाका येथील रेल्वेलाईन ते जुना मुंबई पुणे रस्ता यांच्यामध्ये आरक्षित असलेल्या मोकळ्या जागेचा वापर गेली २० ते २५ वर्ष खेळाचे मैदान म्हणूनच केले जात आहे. या विकास आराखड्यात तसा बदल करावा, यासाठी येथील स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांनी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू ठेवला होता. आता या परिसरात मोठा खेळाचा मैदान झाल्यास येथील खेळाडू व विद्यार्थ्यांचे गेल्या कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.

हेही वाचा –

पनवेल ते हजूर साहिब नांदेड दरम्यान विशेष ट्रेन