डोंबिवली शहरात पश्चिमेला स्टेशन लगत एकच मासळी मार्केट आहे. मात्र या जीर्ण झालेल्या मार्केटची दुरावस्था झाली आहे. सुमारे १५ वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने या मासळी बाजार इमारतीचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यावेळी या प्रकल्पासाठी तीन कोटी ३३ लाख रुपयांचा खर्च पालिकेने प्रस्तावित केला होता. परंतु श्रेयवाद आणि राजकीय कुरघोडीमुळे मासळी बाजाराचा पुनर्विकास मार्गी लागत नव्हता .शिवसेना नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पालिका प्रशासनाने रखडलेला विषय मार्गी लावत निविदा प्रक्रिया सुरु केली आहे.
या कामासाठीची निविदा प्रक्रिया आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी सुरू केली आहे. मोक्याच्या जागेवर असलेल्या मासळी बाजाराच्या पुनर्विकासाचे काम आपल्या ठेकेदाराला मिळावे म्हणून पालिका पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच होती. या विषयावर आता पडदा पडला आहे. मासळी बाजाराची पडझड झाली असून येथील दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. डोंबिवली नगरपरिषदेच्या काळात विष्णुनगर मासळी बाजाराची उभारणी झाली. ४० वर्षापूर्वी बांधलेल्या या इमारतीत आता सुविधा राहिल्या नाहीत. आहे त्या जागी सुसज्ज दोन माळ्याची इमारत बांधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
कल्याण व डोंबिवलीतील जीर्ण झालेल्या मासळी बाजाराचा पुनर्विकास व्हावा व सुसज्ज अशी वास्तु व्हावी म्हणून मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी शासनस्तरावर प्रयत्न केले होते. मत्स्य विकास महामंडळाच्या माध्यमातून निधी देखील मंजूर करून आणला होता. मात्र महापालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी या कामाचे श्रेय मनसेला मिळू नये म्हणून राजकीय कुरघोडी करीत हा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवल्याने मासळी बाजार इमारतीचा पुनर्विकास तब्बल १५ वर्षे रखडला होता.
आता माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मासळी बाजाराच्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न सुरु केले . सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही रखडलेल्या या पुनर्विकासाला अनुकुलता दाखविली त्यामुळे हा विषय मार्गी लागला .प्रशासनाच्या मंजुरीनंतर आता निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे .या मासळी बाजारात एकूण ९२ गाळेधारक आहेत. याठिकाणी तळ अधिक दोन मजली इमारत उभारण्यात येणार असून एकूण ९८१ चौ.मी. बांधकाम करण्यात येणार आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर रस्ता रुंदीकरणातील १२ गाळेधारक, २१ मासळी व १० मटण विक्रेते, पहिल्या माळ्यावर ३९ मासळी विक्रेते, १० मटण विक्रेते, शीतगृह, स्वच्छतागृह तसेच दुसऱ्या माळ्यावर ४७ मासळी विक्रेते, शीतगृह, स्वच्छतागृह प्रस्तावित आहे. रेल्वे स्थानकातील स्कायवाकचा पोहच रस्ता मासळी बाजाराच्या पहिल्या माळ्याला जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी ७ कोटी ४५ लाख खर्च प्रस्तावित आहे. एक ते दीड वर्षात हे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. मासळी बाजारातील विक्रेत्यांचे तात्पुरते अन्यत्र स्थलांतर केल्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल.