मृतांचे अंत्यसंस्कार उघड्यावरच

दुःखी नागरिकांचे हाल

तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींंमध्ये स्मशानभूमी नसल्याने गावात मृत्यू पावणा-या व्यक्तीचे अंत्यसंस्कार हे उघड्यावरच होत आहेत. भर पावसाळयात प्रेत जाळण्यासाठी प्लास्टीक कापडांचा आधार घ्यावे लागत असल्याचे विदारक, संतापजनक चित्र सध्या दिसून येत आहे. यामुळे अंत्यसंस्कार होणार्‍या व्यक्तीच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होते.

तालुक्यातील पळू ग्रामपंचायतीमध्ये विकास कांमांसाठी वर्षाला कोट्यवधी रुपये निधी खर्च केला जात आहे. मात्र एवढा निधी खर्च होत असतांना सुध्दा या खोपोली ग्रामपंचायतीमध्ये स्मशानभुमी नसावी ?असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडल्या शिवाय रहात नाही. मुरबाड तालुक्यात एकुण 126 ग्रामपंचायती असून यात अनेक ग्रुप ग्रामपंचायती समाविष्ट आहेत.

अनेक ग्रामपंचायतींमध्ये आजही स्मशानभूमी नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे स्मशान भूमी नसणा-या ग्रामपंचायतींमधील नागरिकांना भर पावसाळ्यात मोठया संकटांना सामोरे जावे लागत आहे. मृत्यूनंतर शेवटच्या क्षणी सुध्दा भर पावसात मृत व्यक्तीवर अंत्यंसंस्कार होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मागील एक वर्षा पासुन हळूहळू काही गावांना स्मशानभूमी बांधण्याचे कामे प्रगतीपथावर असल्याचे दिसून येत आहेत. तर काही गावांना निधी उपलब्ध असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतु शासन प्रशासन या गंभीर असणा-या बाबींकडे दुर्लक्ष करत आहे. कुठे तरी कुचकामी ठरत असल्याचा आरोप येथील नागरिकांकडुन केला जात आहे.

मुरबाड तालुक्यात मागील दोन वर्षापासून जनसुविधा योजने अंतर्गत ग्रामपंचायती स्थरावर अनेक विकास कामे केली जात आहेत. त्यात खास करुन गावातील नव्याने बांधण्यात येणा-या स्मशानभूमी यांच्यावर लक्ष दिले जात आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी दर्जेदार स्वरुपाच्या स्मशानभूमी बांधण्याचे काम प्रगतीपथावर असले तरी पळू आणि खोपोली ग्रामपंचायत मात्र त्यास अपवाद ठरली आहे. त्यामुळे शासनाने यावर योग्य भुमिका घेवून पावसाळ्यात जाळण्यात येणा-या प्रेतांंच्या अंत्यसंस्काराची हेळसांड होऊ नये यासाठी उपाय योजना करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.

 

पळू ग्रामपंचायतीमध्ये स्मशानभूमी बांधण्यासाठी जागेची खूप मोठी अडचण आहे. मात्र तेथे असणारे ग्रामसेवक यांना तेथे असणा-या जागा मालकाशी बोलून तात्पुरती पत्र्याची स्मशानभूमी बांधण्यास सांगितले आहे.
-दिलीप सोळंखी, प्रशासक, पळू ग्रामपंचायत