घरठाणेरिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; प्रवासी महिलेला परत केले दागिने

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; प्रवासी महिलेला परत केले दागिने

Subscribe

दागिने परत करणाऱ्या प्रामाणिक रिक्षाचालक नितीन वाघोसे यांचा पोलिसांनी सत्कार केला.

आपल्या आयुष्याची पुंजी गहाण ठेवून आपल्या मुलीचा साखरपुडा करण्यासाठी निघालेल्या महिलेचे दागिने रिक्षामध्ये राहिले आणि त्या महिलेवर संकट कोसळले, परंतु प्रामाणिक रिक्षावाल्यामुळे त्या महिलेला आपले दागिने परत मिळाले. मंगळवारी आपल्या मुलीच्या साखपुड्यासाठी सुनीता शिंदे या महिला आपल्या कुटुंबियांसह मुंब्रा येथून आपल्या गावी लातूरला जायला निघाल्या. परंतु गावी जाण्याच्या धावपळीत त्यांची एक बॅग ही रिक्षातच राहिली. या बॅगमध्ये सुनीता शिंदे यांची जमापुंजी म्हणजेच त्यांनी मुलीचा साखरपुडा करण्यासाठी ठेवलेले सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू होत्या. बॅग रिक्षातच राहिल्याचे लक्षात येताच सुनीता  हताश झाल्या. आपल्या कुटुंबियांसोबत रस्त्याच्या कडेला रडत असताना जवळच थांबलेल्या रिक्षा चालक अर्जुन माने याने त्या महिलेला विचारणा केली. महिलेने परिस्थिती सांगितली असता अर्जुन माने याने त्या महिलेला आपल्या रिक्षात बसून पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी लगेचच या महिलेची तक्रार दाखल करून घेतले आणि त्या दिशेने तपास सुरू केला.

सुनीता शिंदे यांचे दागिने ज्या रिक्षात राहिले होते. त्या दागिन्यांवर नितीन वाघोसे या प्रामाणिक रिक्षाचालकाची नजर पडली. आपल्या रिक्षामध्ये राहिलेल्या बॅगमध्ये सोन्याचे दागिने व इतर ऐवज असल्याचे लक्षात येताच. ही बॅग महिलेला परत करण्यासाठी प्रामाणिक रिक्षाचालक नितीन वाघोसे यांनी आपल्या स्थानिक माजी नगरसेवक बालाजी काकडे यांची भेट घेतली आणि त्यांना संपूर्ण घटना सांगितल्यानंतर माजी नगरसेवक बालाजी काकडे यांनी आपल्या प्रभागात राहत असलेल्या सुनीता यांना फोन केला आणि कळवा पोलीस ठाण्यात येऊन त्यांचे सोन्याचे दागिने आणि इतर ऐवज हा महिलेला पोलिसांच्या मदतीने सुपूर्त केला. हे गहाळ झालेले सोन्याचे दागिने व इतर ऐवज परत मिळाल्यानंतर महिलेचा आनंद गगनात मावेनासा झाला. तर सुनीता शिंदे आणि प्रामाणिक रिक्षाचालक नितीन वाघोसे हे दोघे आपल्या प्रभागातील रहिवासी असल्यामुळे महिलेला दागिने मिळवून देणे शक्य झाले असल्याचे माजी नगरसेवक बालाजी काकडे यांनी सांगितले. महिलेचे गहाळ झालेल्या दागिने हे 4 तोळे वजनाचे असून त्यांची किंमत 2 ते 3 लाख इतकी होती. त्यामुळे दागिने परत करणाऱ्या प्रामाणिक रिक्षाचालक नितीन वाघोसे यांचा पोलिसांनी सत्कार केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -