मुख्य जलवाहिनी दुरुस्ती झाली पण पाणीबाणी कायम

ठाणे, घोडबंदर, कोपरी, वागळे इस्टेट भागातून तक्रारी

मुख्य जलवाहिनी दुरुस्तीसाठी ठाणे महापालिकेने 50 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला. सलग चार दिवस झोनिंग पध्द्तीने ही कपात केली. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर रविवारीपासूनच पाणी पुरवठा पूर्ववत केला. मात्र त्या दुरुस्तीनंतर ही ठाणे शहरासह घोडबंदर,कोपरी, वागळे इस्टेट या भागातून पाणी टंचाईची जणू बोंबाबोंब सुरू होती. टंचाईची झळ बसलेले नागरिक समाजमाध्यमांच्या तक्रारी करताना दिसून आले . तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाने रविवारीपासून पाणी पुरवठा पूर्ववत केला असून टंचाईच्या तक्रारी असतील तर त्याच्यावर कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात पाण्याच्या चार स्त्रोतांमार्फत दररोज 585 दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.

त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून 250 दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून 115 दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून आणि स्टेम प्राधिकरणाकडून शहराला पाणी पुरवठा करणार्‍या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामामुळे गेल्या मंगळवारपासून शहराला होणार्‍या पाणी पुरवठ्यात 50 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. शनिवारपर्यंत ही कपात लागू राहणार होती. या काळात नागरिकांना पाणी टंचाईची झळ बसू नये यासाठी पालिकेने शनिवारपर्यंत विभागवार पद्धतीने नियोजन करताना, काही भागात 12 तास तर काही भागात 24 तासानंतर पाणी पुरवठा करण्यात येत होता. 12 तास तर काही भागात 24 तासानंतर पाणी पुरवठा होत असल्यामुळे शहराच्या विविध भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्या भागातून पाणी पुरवठ्यासाठी टँकरची मागणी वाढली होती. दरम्यान, पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने शनिवारी काम पुर्ण करत रविवारपासून शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत केला खरा पण अद्यापही टंचाईची बोंब सुरूच आहे. प्रामुख्याने ठाणे, घोडबंदर, कोपरी, वागळे इस्टेट भागात पाणी टंचाई असल्याच्या तेथून तक्रारी पालिकेकडे येऊ लागल्या असून त्यासाठी नागिरक समाजमाध्यमांचा वापर करीत आहेत.

त्यातच, कळवा, मुंब्रा, दिवा परिसरात एमआयडीसी तर, कोपरी आणि वागळे इस्टेटमधील काही भागात मुंबई महापालिकेमार्फत पाणी पुरवठा होतो. या दोन्ही स्त्रोतांमार्फत होणारा पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरु होता. त्यामुळे त्या परिसर टंचाई झळ बसली नव्हती.पण, मुंब्र्यातील ठाकुरपाडा भागात गेले तीन दिवस पाणी नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात असल्याचे समोर आले आहे.

मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गेले चार दिवस सुरु होते. ते पूर्णत्वास आल्यावर शहराचा पाणी पुरवठा रविवारपासून पुर्ववत करण्यात आला. ती सुद्धा पाणी टंचाईची समस्या जाणवत असेल तर आलेल्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल. – विनोद पवार, उपनगर अभियंता, पाणी पुरवठा विभाग, ठामपा.