अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दीतील विविध विकास कामांचा आढावा घेताना अधिकाऱ्यांकडून योग्य उत्तरे मिळत नसल्याने संतप्त झालेल्या आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते.
अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दीत राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अनुदानातून विकास कामे मंजूर झाली आहेत. तसेच नगरपालिकेत सद्या प्रशासकीय राजवट असून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नागरी समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी पालिका अधिकाऱ्यांना याविषयी प्रश्न केले. मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ आणि पालिकेच्या विविध खाते प्रमुखाकडून नगरपालिकेच्या समिती कक्षात आढावा बैठक बोलवली होती.
या आढावा बैठकीत शहरातील मुख्य रस्ते सोडले तर शहरात अस्वच्छतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून कचरा रोजच्या रोज उचलला जात नाही. ड्रेनेजची देखील साफ सफाई केली जात नसल्याच्या तक्रारी उपस्थित नागरिकांनी मांडल्या. तसेच काही सार्वजनिक शौचलयांची अत्यंत दुरावस्था झाली असून नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांना देण्यात आल्या आहेत. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अद्याप नालेसफाई सुरु झालेली नाही. शहरातील सर्व नाल्यांची सफाई तातडीने करावी अशा देखील सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
नगरपालिकेच्या शाळांमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या सेमी इंग्रजी शाळा तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा जागेसह नगरपालिकेस हस्तांतरीत करण्याच्या प्रस्तावा संदर्भात ही सविस्तर चर्चा या बैकीत करण्यात आली.
या बैठकीला शिवसेना उपशहरप्रमुख परशुराम पाटील, पुरुषोत्तम उगले, माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, पालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके, खाते प्रमुख तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी व युवा सैनिक उपस्थित होते.