घरठाणेजुन्या पेन्शननुसार मिळणारे मासिक पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करावे

जुन्या पेन्शननुसार मिळणारे मासिक पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करावे

Subscribe

मुरबाड ग्रामीण रुग्णालयातील शिपाई अण्णा विशे यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

  गेल्या दोन दिवसांपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचारी वर्ग संपावर गेला आहे. याचदरम्यान खासदार-आमदार यांना पेन्शन देण्यात येते मग आम्हाला का नाही? हा प्रश्न सातत्याने आंदोलकांकडून विचारला जात असताना, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड ग्रामीण रुग्णालयातील कार्यालयीन शिपाई अण्णा कोंडू विशे यांनी त्यांना जुन्या पेन्शननुसार मिळणारे मासिक पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई- मेलद्वारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यांनी दाखवलेला हा उदारमतवादी दृष्टिकोन खरोखरच अभिनंदनास आहे. तसेच त्यांच्या सेवा निवृत्ती वेतनाचा उपयोग शासनात आरोग्य विषयक उपक्रमांना अथवा राज्यातील गरीब दुबळ्या अंध दिव्यांग लोकांच्या कल्याणासाठी व्हावा.असेही नमूद केले आहे. हे निवेदन त्यांनी १६ मार्च रोजी दिले आहे.
 मुरबाड, सोनावळे येथील अण्णा विशे हे १९९७ साली आरोग्य विभागात रुजू झाले. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शिपाई म्हणून कामावर हजर झाले. तर सध्या ते मुरबाड ग्रामीण रुग्णालयात कार्यालयीन शिपाई म्हणून कार्यरत आहेत. २७ वर्ष शिपाई म्हणून सेवा करणारे अण्णा विशे हे फेब्रुवारी २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणार आहे. त्यांना दोन मुले असून ते देखील स्वतःच्या पायावर खंबीर उभे असून स्थिरस्थावर आहेत. तसेच विशे हे निर्व्यसनी जीवन आणि निरामय आरोग्य यामुळे त्यांचा खर्च मर्यादित आहे. त्यातच वडीलोपार्जित शेतकरी असल्याने त्यांनी निवृत्ती वेतन आवश्यक नसल्याचे नमूद करत त्यांना जुन्या पेन्शन नुसार मिळणारे मासिक पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यात यावे असा निर्णय त्यांनी घेत, तसे निवेदन ही मुख्यमंत्री शिंदे यांना दिले आहे.
” सेवानिवृत्ती प्रक्रिया पूर्ण करून शासनातून सेवा मुक्त झाल्यावर आपणास शासनामार्फत कुठल्याही सेवानिवृत्ती वेतनाची आवश्यकता नाही.  सेवा निवृत्ती वेतनाचा उपयोग शासनात आरोग्य विषयक उपक्रमांना अथवा गरीब दुबळ्या अंध दिव्यांग लोकांच्या कल्याणासाठी व्हावा, अशी इच्छा आहे. तरी त्यांच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून निवृत्ती वेतन महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब, दिन, दुबळ्या, दिव्यांग लोकांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री निधीमध्ये जमा करावा. अशी विनंती केली आहे.”- अण्णा विशे, शिपाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -