जिल्हयातील कोरोना बाधितांचा आकडा सहा लाखांवर

१४ दिवसात ३१ हजार नव्या रुग्णांची भर

What happens if both Corona and Influenza infections occur at the same time? Read the answer to 'WHO'

गेल्या काही दिवसात ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील १४ दिवसात वाढलेल्या ३१ हजार कोरोना बाधितांमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील बाधितांनी सहा लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामध्ये ५ लाख ६० हजार ६९६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केलेली आहे. तर दुसरीकडे सुरू असलेल्या लसीकरणामुळे जिल्ह्यात एक लाख रुग्ण संख्या वाढीसाठी जवळपास ७ ते ८ महिन्यांचा कालावधी लागल्याचे आकडेवारी स्पष्ट दिसत आहे. दुसऱ्या लाटेत सलग तीन महिने जिल्ह्यात एक लाख कोरोना रुग्ण आढळून येत होते.

ठाणे जिल्ह्यात ७ जानेवारी २०२२ पर्यंत सहा लाख ३०२८ कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. यामध्ये काही जण हे दुसऱ्यांदा ही कोरोना बाधित झाले आहेत. त्यापैकी ५ लाख ६० हजार ६९६ जणांनी कोरोनावर यशस्वी रित्या मात केली आहे. मात्र ११ हजार ६२५ जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. तर १६ हजार ५०९ जण उपचार घेत आहे. याचदरम्यान जिल्ह्यात सुरू झालेल्या लसीकरणात आतापर्यंत एकूण १ कोटी १३ लाख ८६ हजार १३४ लसींचे डोसेस देण्यात आले. यामध्ये पहिला डोस ६५ लाख ११ हजार १८ नागरिकांना तर ४८ लाख ७५ हजार ११६ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण ठामपा
जिल्ह्यात (७ जानेवारीपर्यंत) सर्वाधिक १ लाख ५३ हजार ८२ रुग्ण हे ठामपामध्ये आढळून आले आहे. त्या पाठोपाठ केडीएमसी आणि नवीमुंबईत एक लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर सर्वात कमी ११ हजार २०४ रुग्ण संख्या ही भिवंडीत नोंदविण्यात आली आहे. रुग्ण वाढीत दोन नंबर असलेल्या केडीएमसीने मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांमध्ये आघाडी घेतली आहे. तेथे सर्वाधिक २ हजार ८५४ जण दगावले आहेत.

कोरोनावर मात करण्यात केडीएमसी प्रथम
रुग्ण संख्येत जरी दुसऱ्या क्रमांक असले तरी कोरोनावर मात करण्यात केडीएमसीने पहिला नंबर राखला आहे. आतापर्यंत केडीएमसीमधील १ लाख ४२ हजार ६४१ जणांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ठामपामध्ये १ लाख ४० हजार ६७७ जण कोरोना मुक्त झाले आहेत. नवीमुंबईत १ लाख ८ हजार १६१ जणांनी कोरोनाला हरवले आहे. सर्वात कमी रुग्ण संख्या असलेल्या भिवंडीत १० हजार ४४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीचा आलेख
दिनांक          रुग्ण संख्या
२६/०६/२०२०   ०,२६,१४७
११/०७/२०२०   ०,५०,९२०
१२/०८/२०२०   १,००,२०९
१९/१०/२०२०   २,००,४७०
२६/०३/२०२१   ३,०२,५५९
१५/०४/२०२१   ४,०१,०५४
१६/०५/२०२१   ५,००,८२५
०७/०१/२०२२   ६,०३,०२८