पालिका आयुक्तांवर शाई टाकण्याचा डाव पोलिसांनी उधळला

महापालिका मुख्यालय आणि त्यांच्या दालनाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका आयुक्तांवर जोरदार टीका केल्यानंतर बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्यावर शाई टाकण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच महापालिका मुख्यालय आणि त्यांच्या दालनाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. महापालिकेत येताना आणि घरी परताना आयुक्तांसोबत पोलीस बंदोबस्त होता. सकाळीच पोलिसांना या प्रकाराची कुणकुण लागल्याने राष्ट्रवादीचा शाई फेकण्याचा धाव पोलिसांनी सहज उधळून लावला. शाई टाकणे सोडा कार्यकर्त्यांनी पालिकेत प्रवेशही करून दिला नाही.

दिवा येथील एमएमआरडीए योजनेतील घर घोटाळा प्रकरणातील आरोपींवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी सोमवारी महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन पुकारले होते. त्या दिवशी आंदोलनकर्त्यांना भेट देण्यासाठी आलेल्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. याचदरम्यान बुधवारी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आयुक्तांवर शाई टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी तातडीने महापालिका मुख्यालयात बंदोबस्त तैनात केला. पालिकेच्या चारही गेट वरून येणाऱ्या जाणाऱ्यांची पूर्ण माहिती घेऊनच मुख्यालयात प्रवेश दिला जात होता. या सर्व प्रकारामुळे पालिकेला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. एकीकडे राष्ट्रवादी चे कार्यकर्ते महापालिकेच्या बाहेर परिस्थितिचा आढावा घेत होते. त्यातच राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष आनंद परांजपे हे कार्यकर्त्यांसोबत दुपारच्या सुमारास पालिका मुख्यालयाबाहेर आले आणि निघून गेले. तर पालिका अधिकारी इतरांना फोन करुन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा कानोसा घेत होते. मात्र पोलिसांनी वेळी घेतलेल्या खबरदारीमुळे अनर्थ टळला.

खासगी गाडीतून आले आयुक्त
पोलिसांनी माहिती कळताच पोलिसांनी महापालिका आयुक्तांना त्यांच्या गाडीऐवजी एका खासगी गाडीतून सुखरूप पालिकेत आणण्यात आले. तसेच सांयकाळी घरी परताना पुन्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार अशी कुणकुण लागल्याने पोलिसांच्या कडकोट बंदोबस्तात घरी सोडले.