Eco friendly bappa Competition
घर ठाणे डोंबिवली रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट

डोंबिवली रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट

Subscribe

मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. रेल्वे स्थानकात प्रवाशांना अत्यावश्यक सर्व पंचतारांकीत सुविधा देण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे.मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या माध्यमातून टप्पा तीन ए अंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील एकूण १७ रेल्वे स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये डोंबिवली, मुलुंड रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या दोन्ही स्थानकांच्या विकासासाठी १२० कोटीचा निधी प्रस्तावित असून निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे.

डोंबिवली हे गर्दीचे स्थानक असल्याने काही वर्षापूर्वी डोंबिवली रेल्वे स्थानकातील जुने रेल्वे तिकीट घरे व जिन्यांची जुनी रचना काढून नव्या रचनेत रेल्वे स्थानकाची बांधणी करण्यात आली होती. आता वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करुन रेल्वेने अत्याधुनिक, पंचतारांकीत सुविधा प्रवाशांना देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वयंचलित रेल्वे स्थानके हा विचार करुन या स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. ठेकेदारांना कामाचे आदेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पावसाळ्यानंतर म्हणजे ऑक्टोबर पासून या कामाला सुरुवार होणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

- Advertisement -

डोंबिवली रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे तीन लाख प्रवासी येजा करतात. शहरा लगतच्या परिसराचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. कल्याण शिळ मार्गावर मोठमोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. त्याचप्रमाणे डोंबिवली परिसराला नवी मुंबई विमानतळ जवळ पडणार असल्याने नागरिक भविष्याचा विचार करुन शिळफाटा परिसरातील गृहसकुलांमध्ये घरे घेण्याला प्राधान्य देत आहेत. या भागातील लोकांना जवळचे रेल्वे स्थानक म्हणून डोंबिवली रेल्वे स्थानकात यावे लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात डोंबिवली रेल्वे स्थानकात वाढणारा प्रवासी भार विचारात घेऊन रेल्वे स्थानकात अत्याधुनिक सुविधा देण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे. रेल्वे स्थानकातील विद्युत साधनांची नव्याने उभारणी, संपर्क आणि दळणवळण सेवा केंद्रात नवीन यंत्रणा टाकण्यात येणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी डोंबिवली रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे.

येत्या काळात डोंबिवली रेल्वे स्थानकाचा कायापालट होईल, मात्र स्टेशन परिसराचा विकास कधी होणार ? हाच खरा सवाल आहे . डोंबिवली रेल्वे स्थानक हे गर्दीचे रेल्वे स्थानक आहे. स्टेशन बाहेर सराराशे साठ अनधिकृत रिक्षा स्टेन्ड व फेरीवाल्यांचा विळखा यामुळे स्टेशन बाहेर पडणे प्रवाशांना मुश्कील होते. हीच बाब लक्षात घेवून केडीएमसीने २० वर्षांपूर्वी स्टेशन मधून बाहेर पडणाऱ्या गर्दीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी व प्रवाशांना मुक्तपणे स्टेशन मध्ये जाणे – येणे सोयीचे व्हावे म्हणून थेट रेल्वे स्थानकाला जोडणारे पादचारी पूल बांधले. मात्र तरीही स्टेशन बाहेरील रिक्षांचा गराडा व फेरीवाल्यांचा विळखा कायम राहिला .त्यावर उपाय म्हणून स्टेशन परिसराचा ठाणे रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर कायापालट करण्याचे नियोजन केडीएमसी प्रशासनाने केले होते. डोंबिवली विभागीय कार्यालयाची जुनी व धोकादायक झालेली इमारत पाडून त्या जागेवर इंदिरा चौक ते बाजीप्रभू चौक दरम्यान प्रशस्त व्यापारी संकुल उभारायचे प्रस्तावित आहे .त्यामध्ये तळ मजल्याला बस आगार, बाजुला रिक्षा वाहनतळ उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

त्यामुळे रेल्वे स्थानकातून पादचारी पुलावरून बाहेर पडलेला प्रवासी थेट रिक्षा तळ, बस आगारात येतील अशा प्रकारचे नियोजन होते. तसेच या संकुलात पालिकेचे विभागीय कार्यालय,नागरिक सुविधा केंद्र यासह तलाठी, भूमी अभिलेख, महसूल विभाग व इतर सर्व कार्यालये एकाच इमारतीत करण्याचे नियोजन होते. मात्र या महाकाय प्रकल्पाचे काम कोणत्या बिल्डर्स – ठेकेदाराला द्यायचे ? यावरून डोंबिवलीतील प्रमुख राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींमध्येच वाद नव्हे संघर्ष आहे.

- Advertisment -