घरठाणेज्येष्ठ महिला सफाई कामगाराला स्वतःच्या खुर्चीत बसवले; सेवानिवृत्तीचा हृदय निरोप समारंभ

ज्येष्ठ महिला सफाई कामगाराला स्वतःच्या खुर्चीत बसवले; सेवानिवृत्तीचा हृदय निरोप समारंभ

Subscribe

नुकताच मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांनी आपल्या सेवानिवृत्त चालकाला गाडीत बसवून स्वतः गाडी चालवत घरी सोडल्याच्या एका अविस्मरणीय प्रकारामुळे समाजात एक चांगला संदेश दिला गेला आहे.

तुम्ही माझ्या आई समान आहात असे भावनिक उद्गार काढून एका महिला सफाई कामगाराला स्वतःच्या खुर्चीत बसवून शाल, श्रीफळ, साडी चोळी देऊन हृदय सन्मान करणाऱ्या शहापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव गारवे तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांसह समस्त शहापुरकरांकडून कौतुकांचा वर्षाव केला जात आहे. लक्ष्मीबाई धर्मपाल वाल्मिकी या महिला सफाई कामगाराचा सेवानिवृत्तीचा डोळ्यांचे पारणे फिटविणाऱ्या निरोप समारंभात उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मने भारावून गेली. नुकताच मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांनी आपल्या सेवानिवृत्त चालकाला गाडीत बसवून स्वतः गाडी चालवत घरी सोडल्याच्या एका अविस्मरणीय प्रकारामुळे समाजात एक चांगला संदेश दिला गेला आहे. शहापूर नगरपंचायतीमध्येही सेवानिवृत्त झालेल्या महिला सफाई कामगाराचा मुख्याधिकारी यांनी हृदय सन्मान करून समाजात एक वेगळाच संदेश पोहचवला आहे.

शहापूर नगरपंचायतीमधील सफाई कामगार लक्ष्मीबाई धर्मपाल वाल्मिकी या गेल्या ३० वर्षांपासून सफाई कामगाराची सेवा करीत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. नगरपंचायतीमध्ये पार पडलेल्या सेवानिवृत्तीच्या निरोप समारंभात मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी लक्ष्मीबाई यांना शाल, श्रीफळ, साडी, पुष्पगुच्छ देऊन सत्कार तर केलाच, या पलीकडे जाऊन तुम्ही माझ्या आई समान आहात, निवृत्ती नंतरही तुम्हाला कंत्राटी सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करू तसेच तुमच्या वारसांना सफाई कामगाराच्या सेवेत सामावून घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवू असे अश्वासित करून त्यांना मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसवून त्यांचा यथोचित सन्मान केला. मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी मोठया मनाने एका महिला सफाई कामगाराचा केलेला सन्मान पाहून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी भाग्योदय परदेशी, भूषण शेट्टी, माजी नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, कामगारवर्ग उपस्थित होते. नगरपंचायत मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह समस्त शहापुरकरांकडून आदर्श अधिकारी म्हणून वैभव गारवेंचे कौतुक केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -