घरठाणेडाळ खिचडी आणि ठाणे सिव्हील हॉस्पिटलची अनोखी कथा; रुग्णालय कर्मचारी आणि डाॅक्टरांचे...

डाळ खिचडी आणि ठाणे सिव्हील हॉस्पिटलची अनोखी कथा; रुग्णालय कर्मचारी आणि डाॅक्टरांचे कौतुक

Subscribe

वेळ आणि काळाची परवा न करता केलेल्या प्रयत्नामुळे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरामधील पुन्हा एखादा माणुसकीचे दर्शन पाहण्यास मिळाले.

सिनेमागृहात दाखविण्यात येणाऱ्या एखाद्या बॉलिवूड चित्रपटाच्या कथानकासारखीच काहीशी मिळतीजुळती कहाणी बुधवारी पहाटेच्या सुमारास ठाणे जिल्हा विठ्ठल सायन्ना (सामान्य) शासकीय रुग्णालयात अनुभवता आली. पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास नऊ महिन्यांची गरोदर महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याने रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाली. मात्र, मातृत्वापुढे कोरोनाचे संकट तिला किरकोळ वाटले. पण, सायंकाळपासून पोटात अन्नाचा कण नसल्याने त्या महिलेचा व्याकुळपणा डॉक्टर पुष्कराज रसाळ यांनी हेरला. सहज म्हणून ताई काही खाल्ले आहे असे विचारल्यावर नाही असे उत्तर येताच डॉक्टर रसाळ यांची रुग्णालयाच्या किचनपासून बाहेरील हॉटेलमध्ये काही मिळते का यासाठी धावपळ सुरू झाली. अखेर ५ ते सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास डिलिव्हरी बॉय डाळ-खिचडी घेऊन आला. वेळ आणि काळाची परवा न करता केलेल्या प्रयत्नामुळे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरामधील पुन्हा एखादा माणुसकीचे दर्शन पाहण्यास मिळाले.

बदलापूर येथील प्रिया नामक ( नाव बदलेले आहे) महिला नऊ महिन्यांची गरोदर असल्याने त्यांच्या पायाला सूज आली होती. या आलेल्या सुजीमुळे त्यांना नीट उभे किंवा चालता ही येत नसल्याने त्याच्या शेजारी राहणाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी त्यांना बदलापूर येथील स्थानिक रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना ठाणे,कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार खासगी वाहनांनी शेजाऱ्यांच्या मदतीने ३८ किलो मीटर प्रवास करून त्या कळवा रुग्णालयात आल्या. यावेळी त्यांची सुरवातीला कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल रात्री उशिरा आला. त्यामध्ये त्या पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यावर त्यांना तातडीने ठाणे जिल्हा विठ्ठल सायन्ना (सामान्य) शासकीय रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्यानुसार, त्या महिलेला घेऊन तिचे नातेवाईक आणि शेजारी साधारण पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात रुग्णवाहिकेने दाखल झाले. त्यावेळी कर्तव्यावर डॉ पुष्कराज रसाळ होते. त्यांनी कोणताही विलंब न करता, त्या महिलेला भरती करून घेत उपचार सुरू केले.

- Advertisement -

याचदरम्यान डॉ रसाळ यांना त्यांच्या चेहऱ्यावरील व्याकुळपणा आणि अंगातील अशक्तपणा पाहून सहज विचारले. काही खाल्ले आहे का? त्यावेळी, प्रिया नामक महिलेने बदलापूर तेथे कळवा आणि कळवा ते ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रवास दरम्यान काही खाल्ले नाही असे सांगितले.डॉ.रसाळ यांनी त्या महिला वॉर्डमध्ये जेवणाच्या थाळी बद्दल विचारणा केली त्यावेळी काही नाही. मग रुग्णालयाच्या किचन मध्ये चौकशी केली. तर तेथेही काही नसल्याचे समोर आले. त्याचवेळेस परिचारिका सायली मोरे यांनी नेत्रालय इमारतीमधून एक बिस्कीटचा पुडा आणला. पण, पुड्याने पोट भरणे शक्य नसल्याने डॉक्टरांनी रुग्णालयाच्या परिसरातील रात्री उघड्या असणाऱ्या हॉटेल्सचे नंबर जस्ट डायल कडून घेतले. सुरुवातीला कोणी फोन उचलत नव्हते. ८ ते १० नंबर लावल्यानंतर दोघा-तिघांनी फोन उचलले.

परंतु तेथे पिझा व्यतिरिक्त काही नव्हते. हे पदार्थ महिलेच्या पायाला आलेल्या सुजेच्या दृष्टीने योग्य नव्हते. त्यातच आणखी एका नंबर डायल केल्यावर येथे डाळ खिचडी मिळेल असे समोरून सांगण्यात आले. त्यानुसार ऑर्डर दिली. पण कमी नमकीन आणि कमी तिखट असे सांगितले. जवळपास सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास चेतन नामक डिलिव्हरी बाय डाळ खिचडी घेऊन आला. त्याला पैसे देत डॉक्टरांनी तातडीने ती डाळ खिचडी त्या महिलेला खाऊ घातली. अशाप्रकारे डॉक्टरांमधील माणुसकीचा प्रत्यय आला.

- Advertisement -

” ती महिला अशक्त असल्याचे पाहून सहज विचारले. ती नाही म्हटल्यावर तिला नाही पण तिच्या बाळाला भूक लागली असेल. याच्यातून प्रयत्न केले त्यातून पहाटेच्या सुमारास त्या दोघांना डाळ खिचडी खाऊ घातले, याचे समाधान काही वेगळे आहे. ”
– डॉ. पुष्कराज रसाळ, जिल्हा शासकीय रुग्णालय ठाणे.

” ही एक मोठी गोष्ट आहे. तसेच अभिमानास्पद बाब आहे. यामुळे नक्की शासकीय रुग्णालयाबद्दल विश्वास आणि आपुलकी निर्माण होते. तर, डॉ. रसाळ यांचे जेवढे धन्यवाद मानावे तेवढे कमी आहे. ”
– डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -