अवघड क्षेत्रातील रिक्त पदे शिक्षक भरतीतून भरावीत

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली करतांना शासनाने अवघड क्षेत्र व सुगम क्षेत्र असे वर्गीकरण केले असून प्रशासनाने सुगम क्षेत्रात दहा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांची वास्तव सेवाजेष्ठतेनुसार यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीतील बहुतांश शिक्षक हे सेवाजेष्ठ आहेत.अनेकजण व्याधींनी त्रस्त आहेत. कहर म्हणजे सेवेची अवघी पाच महिने सेवा शिल्लक राहिलेल्या शिक्षकांचा देखील बदली यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. बहुतांश शिक्षकांना वयाची 53 वर्ष पूर्ण झालेले आहेत. काहींची बायपास सर्जरी झालेली आहे.त्यामुळे यावर्षी दुर्गम भागात करण्यात येणार्‍या बदल्या रद्द करुन नवीन शिक्षक भरतीतून सदर रिक्त जागा भरण्यात याव्यात अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने ग्रामविकास व शालेय शिक्षण मंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

गेले तीन महिने राज्यातील प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेतील पाच टप्पे पूर्ण झाले असून शेवटचा टप्पा राहिलेला आहे. यामध्ये अवघड क्षेत्रातील रिक्त शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूक करणे अनिवार्य आहे. याकरिता प्रशासनाने सुगम क्षेत्रात दहा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांची वास्तव सेवा जेष्ठतेनुसार यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीतील बहुतांश शिक्षक हे सेवाजेष्ठ आहेत.अनेकजण व्याधींनी त्रस्त आहेत. कहर म्हणजे सेवेची अवघी पाच महिने सेवा शिल्लक राहिलेल्या शिक्षकांचा देखील बदली यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. बहुतांश शिक्षकांना वयाची 53 वर्ष पूर्ण झालेले आहेत. काहींची बायपास सर्जरी झालेली आहे.पती पत्नी एकत्रीकरण झालेल्या शिक्षकांच्या जोडीदार बदलीपात्र झाला आहे.नवीन धोरणाविषयी शिक्षकांना पुरेशी माहिती नसल्याने व शासनाकडून उशीरा मार्गदर्शन प्राप्त झाल्याचा फटका सेवाज्येष्ठ शिक्षकांना बसला आहे. त्यामुळे यावर्षी दुर्गम भागात करण्यात येणार्‍या बदल्या रद्द करुन नवीन शिक्षक भरतीतून सदर रिक्त जागा भरण्यात याव्यात अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष देविदास बस्वदे व सरचिटणीस कल्याण लवांडे यांनी निवेदनाद्वारे ग्रामविकास मंत्र्याकडे केली आहे.

संवर्ग एक मधील शिक्षकांना आँनलाइन बदलीमध्ये सवलत देण्यात आली होती.त्यानुसार विद्यमान शाळेमध्ये तीन वर्षे पूर्ण झाली आहे असे शिक्षक स्वेच्छेने बदली घेऊ शकत होते.ज्यांना बदली हवी आहे त्यांनी बदलीचा लाभ घेतला परंतु ज्यांना बदली नको होती अशा शिक्षकांनी बदलीपात्र नसल्यामुळे बदलीस होकार अथवा नकार दिला नाही. नियमानुसार त्यांनी केलेली कृती योग्य होती.परंतुदुर्गम क्षेत्रातील बदलीसाठी प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये संवर्ग एकमध्ये समाविष्ट असणार्‍या व बदलीपात्र नसल्यामुळे बदलीस नकार न दिलेल्या अनेक शिक्षकांचा समावेश करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शासनाने शिक्षकांच्या बदलीसाठी संगणकीय प्रणालीचा वापर केला आहे. बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणणे हा त्यामागे हेतू होता.नवीन धोरणाविषयी पुरेसी माहिती नसल्याने व शासनाने उशीरा मार्गदर्शक सूचना दिल्याने बदली प्रक्रियेमध्ये वयोवृद्ध झालेले सेवाजेष्ठ शिक्षक हे भरडले जात आहेत. त्यामुळे शिक्षक बांधवांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
आत्तापर्यंत बदली झालेल्या शिक्षकांना एप्रिल 2023 पर्यंत कार्यमुक्त केले जाणार नाही असे शासनाने जाहीर केले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्व शाळांचे कामकाज सुरळीत चालू आहे. तसेच शासनाने शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामुळे दुर्गम भागातील पदे भरण्याकरिता सेवाज्येष्ठ शिक्षकांची बदली न करता नवीन भरती करावी व दुर्गम भागातील पदे भरावीत असाही पर्याय शासनाकडे उपलब्ध आहे. त्यामुळे कोणाचीही गैरसोय होणार नाही. सद्यस्थितीत जे दुर्गम भागात आहेत ते बदली झालेल्या ठिकाणी रुजू होतील. सेवा जेष्ठ शिक्षक त्यांच्या विद्यमान तालुक्यातच राहतील व दुर्गम भागातील पदे भरती प्रक्रियेने भरली गेल्याने तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.सेवाजेष्ठ शिक्षकांवर अन्याय होवू नये याबाबत ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांची लवकरच संघटनेचे पदाधिकारी भेट घेणार आहेत.