येत्या १० एप्रिलला भांडार्ली येथे होणार कचऱ्यावर प्रक्रिया

महापालिकेचा दावा

भाडेतत्त्वावर घेतलेल्या भांडार्ली येथे येत्या १० एप्रिल पासून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात होणार आहे. तसेच डायघर येथेही येत्या काळात १२०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. मात्र डायघर येथील १८ हेक्टर पैकी ८ हेक्टर जागा समाजमंदिर आणि मैदानासाठी जात असल्याने तेवढीच जागा शोध घेण्याबाबत शहर विकास विभागाला महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी दिल्या आहेत. तसेच डायघर येथील महावितरणचे हायटेन्शन वायर स्थलांतरीत करण्यासंदर्भातील निविदा देखील पालिकेने काढली आहे अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

ठाणे महापालिका आयुक्तांच्या दालनात नुकतीच आयुक्तांनी घनकचरा विभागाची बैठक बोलवली होती.यावेळी भंडार्ली आणि डायघर येथील प्रकल्पांचा आयुक्तांनी आढावा घेत, संबंधित अधिकाऱ्यांना काही सुचना देखील केल्या. केवळ भंडार्लीकडे लक्ष देत असतांना डायघरकडे दुर्लक्ष न करण्याच्या सुचना केल्या त्याशिवाय या ठिकाणी शासनाने पूर्वी १८ हेक्टर जागा मंजुर केली होती.

त्यातील ८ हेक्टर जागा ही रस्ता, खेळाचे मैदान आणि समाज मंदिरासाठी गेली आहे. परंतु त्यामुळे प्रकल्पाचे आकारमान कमी होणार आहे. त्यामुळे याच ठिकाणी पर्यायी जागेचा शोध घेण्याबाबत प्रामुख्याने सूचना शहर विकासाला करताना या ठिकाणी घनकचरा विभागाचे देखील आरक्षणाच्या जागा आहेत, तसेच इतर काही आरक्षित भुखंड देखील आहेत, ते आता या डम्पींगसाठी वापरता येऊ शकतात का? याचा विचार करावा असे म्हटले आहे. तर डायघर येथील प्रकल्पासाठी मशीन येणाऱ्या आहेत. त्या मशीस ठेवण्यासाठी पायलींग करणे ,प्लींथ उभारणे आदी कामेही तातडीने पूर्ण करण्यास सांगितले आहे. तर याठिकाणी महावितरणच्या हायटेन्शन वायरचा मोठा अडथळा होता. त्यामुळे ही वायर हटविण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहे. या संदर्भातील निविदा प्रक्रिया प्रसिध्द केली असून येत्या एक महिन्यात हे काम सुरु होणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

याच परिसरात १५ हजार ७८० वृक्ष लागवड करून तो परिसर बफर झोन करण्यात आला आहे. तो झोन कायम ठेवण्याच्या सुचना करतांनाच येत्या काळात येथे १२०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने नागरीकामे करण्याच्या सुचना आयुक्तांनी दिल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.