शासन निर्णयाच्या अनुषंगाने केडीएमसी महापालिकेत कर्मचा-यांच्या वारसांना वारसाहक्काने व अनुकंपा तत्वावर नोकरी मिळू शकते परंतू यासाठी अर्ज करतेवेळी लागणा-या कागदपत्रांची/अटी शर्तींची पूर्ण माहिती नसल्यामुळे संबंधित लाभार्थ्यांस (वारसास) वारंवार महापालिकेकडे विचारणा करावी लागते. हे लक्षात घेवून अशा लाभार्थ्यांना (वारसांना) वारंवार महापालिकेकडे हेलपाटे घालावे लागू नयेत म्हणून महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी आज अनुकंपा तत्वावर महापालिकेकडे अर्ज केलेल्या लाभार्थ्यांसाठी (वारसांसाठी) मार्गदर्शनपर शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरात उपायुक्त अर्चना दिवे यांनी व्यक्तिश: उपस्थित लाभार्थ्यांशी (वारसांशी) संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे अनुकंपा तत्वावर पदभरती करणेबाबतच्या प्रक्रियेची सुलभ भाषेत माहिती दिली.
या मार्गदर्शन शिबीरात उपस्थित लाभार्थ्यांना (वारसांना) व्यवस्थितरित्या माहिती प्राप्त झाल्यामुळे महापालिकेत अनुकंपाने नोकरी मिळण्याबाबतचा त्यांचा मार्ग आता सुकर झाला आहे. या शिबीरात एकूण 39 लाभार्थी (वारस) उपस्थित होते. याच शिबीराप्रमाणे वारसाहक्काने नोकरी मिळणेकामी महापालिकेकडे अर्ज केलेल्या लाभार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन 26 ऑगस्ट 2023 रोजी महापालिका मुख्यालयात करण्यात येणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अर्चना दिवे यांनी दिली आहे.