Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ठाणे राज्यातून जुलै अखेरपर्यंत म्युकरमायकोसिस हद्दपार

राज्यातून जुलै अखेरपर्यंत म्युकरमायकोसिस हद्दपार

Related Story

- Advertisement -

येत्या जुलैच्या शेवटपर्यंत म्युकरमायकोसिस सारखा गंभीर आजार महाराष्टातून नाहीसा होणार आहे. असा महत्वाचा खुलासा सरकारच्या म्युकरमायकोसिस टास्कफोर्सचे प्रमुख डॉ. आशिष भूमकर यांनी केला आहे. कोरोनासारख्या भयंकर महामारीशी दोन हात करत असतानाच म्युकरमायकोसिस सारख्या आजाराने डोके वर काढले आणि लोकांची चिंता अजून वाढवली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून म्युकरमायकोसिस रुग्णांची नोंद करण्यास सुरुवात झाली.

मेच्या पहिल्या १५ दिवसांमध्ये म्युकरमायकोसिसचे १४८७ रुग्ण होते तर मृत्यूची संख्या १०७ होती. परंतु जून मध्यापर्यंत रुग्णसंख्येचा आलेख जवळपास सातपटीने वाढला आहे. सध्या राज्यात ७३९५ रुग्ण असून ६४४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात म्युकर मायकोसिसचा मृत्यूदर सुमारे नऊ टक्के आहे. राज्यात कोरोनाची लाट ओसरत आली तरी म्युकरचा प्रादुर्भाव मात्र वाढताना दिसत आहे.

- Advertisement -

गेल्या महिनाभरात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या सुमारे ८० टक्क्यांनी वाढली असून मृतांच्या संख्येतही सुमारे ८३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबई येथे आहेत. हे एकीकडे जरी सुरू असले तरी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. येत्या जुलैच्या शेवटपर्यंत म्युकरमायकोसिस सारखा आजार महाराष्टातून नाहीसा होणार, असा महत्वाचा खुलासा म्युकरमायकोसिस टास्कफोर्सचे प्रमुख डॉ. आशिष भूमकर यांनी केला आहे.

तर पहिल्यांदा हा आजार जेव्हा समोर आला तेव्हा या विषयी उपचार यंत्रणा जागी झाली. परंतु सध्या जे कोरोनाचे उपचार घेत आहेत. त्यांचा मधुमेह कसा नियंत्रणात राहील याकडे डॉक्टर आवर्जून पाहत आहेत. तर त्यांचे वारंवार म्युकर मायकोसिसची टेस्ट केली जात आहे. त्यामुळे येणार्‍या काळात हे रुग्ण हळू हळू कमी होणार आहेत. तसेच या आजाराची औषधेही आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या आजारावर अंकुश बसणार आहे.

- Advertisement -

राज्यात म्युकरचे सर्वाधिक रुग्ण पुणे (१२१५) आणि नागपूर (११८४) मध्ये आहेत. एकूण रुग्णसंख्येपैकी सुमारे ३२ टक्के रुग्ण या दोन जिल्ह्यामध्ये आहेत. नागपूरमध्ये महिनाभरात रुग्णसंख्या सुमारे पाच पटीने वाढली असून मृतांची संख्या सातवरून १०१ वर गेली आहे. पुण्यातही साधारण हीच स्थिती आहे. पुण्यामध्ये महिनाभरात रुग्णांची संख्या सुमारे चार पटीने वाढली असून मृतांची संख्या २० वरून ८५ वर गेली आहे.अशी आकडेवारी जरी समोर आली असली तरी मात्र ही आकडेवारी जुलैपर्यंत कमी झालेली नक्की दिसेल असे तज्ज्ञांनी सांगितलेले आहे.

‘अनेक रुग्ण हे नाक, घसा, कान स्पेशालिस्टकडे सल्ला घेताना दिसतात. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरकडे या रुग्णाची नोंद होते. त्यामुळे एकाच रुग्णाची अनेक डॉक्टरकडे नोंद होते. यासाठी आकडेवारी वाढलेली दिसते. तर अ‍ॅम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा तुटवडा आणि वाढलेल्या भरमसाट किमती यामुळे जिथे इंजेक्शन मोफत उपलब्ध असेल अशा ठिकाणी रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी जात आहेत. सर्वाधिक रुग्ण असणार्‍या जिल्ह्यामधील रुग्णांपेक्षा जवळच्या जिल्ह्यामधून उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे येथे रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येते आहे. परंतु येत्या जुलै अखेरपर्यंत महाराष्ट्रातून म्युकर मायकोसिस हा हद्दपार होणार आहे’
-डॉ. आशिष भूमकर, सरकारच्या म्युकरमायकोसिस टास्कफोर्सचे प्रमुख

- Advertisement -