घरठाणे‘मॉर्निंग वॉक प्लाझा’साठी तीन ठिकाणच्या वाहतुकीत बदल

‘मॉर्निंग वॉक प्लाझा’साठी तीन ठिकाणच्या वाहतुकीत बदल

Subscribe

वाहतूक शाखेची माहिती

ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच पोस्ट कोव्हिडनंतरच्या काळात सकाळच्या वेळेत व्यायाम आणि मॉर्निंग वॉक प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक बनल्याने सुरक्षितपणे व्यायाम व चालता यावे यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या संकल्पनेतून ठाण्यात ३ ठिकाणी येत्या १ एप्रिल, २०२२ पासून ‘मॉर्निंग वॉक प्लाझा’ शुभारंभ होत आहे. त्यासाठी वाहतूक शाखेनेही कंबर कसली असून त्यासाठी निश्चित केलेल्या तीन ठिकाणावरील वाहतुकीत सकाळच्या वेळेत बदल केला आहे. तसेच हा बदल ३० दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर असल्याचे म्हटले असून वाहन चालकांनी सहकार्य करावे असे आवाहनही वाहतूक शाखेने केले आहे.

ठाणे शहरामध्ये नौपाडा, वागळे कापूरबावडी, कासारवडवली वाहतूक उपविभागाचे हद्दीत मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यामुळे लोकसंख्या व वाहनांच्या संख्येत ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या परिसरातील नोकरदार वर्ग व उद्योगधंदे करणारे नागरिक दररोज सकाळी त्यांच्या वाहनांनी मुंबई, कल्याण, भिवंडी व नवी मुंबईकडे प्रवास करण्याचे प्रमाण जास्त आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढावी व नियमित व्यायाम करावा, या उद्देशाने बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले दररोज सकाळी ०५:०० ते ०७:०० वा. दरम्यान मॉर्निंग वॉक करण्याकरिता बाहेर पडत असतात.
या परिसरात टू- व्हिलर, थ्री व्हिलर, फोर व्हिलर वरील वाहनचालक सकाळी भरधाव वेगाने वाहने चालवित असल्याने या परिसरातील मॉर्निंग वॉकचे ठिकाणी अपघात होवून जिवितहानी होवू नये तसेच परिसरात वाहतूक कोंडी होवू नये व वाहतूक सुरळीत सुनिश्चित होणे करीता नागरिकांच्या सोईसाठी वाहतुकी बदल करण्यात आला आहे. त्यानुसार वाहतुक शाखेने अधिसूचना काढण्यात आली आहे.

- Advertisement -

या ठिकाणी आहे नो-एण्ट्री तसेच पर्यायी मार्ग
शहरातील तीन हात नाका कडून उजवे बाजूच्या सर्व्हिस रोडने धर्मवीरनगर नाका कडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना (पायी प्रवासी व सायकल वगळून) तीन हात नाका येथे “प्रवेश बंद” करण्यात येत आहे. त्यामुळे ती वाहने तीन हात नाका येथून उजवीकडे वळण घेवून हरिनिवास मार्गे मार्गक्रमण करतील. तर , धर्मवीरनगर नाका सर्व्हिस रोडने तीन हात नाका कडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना (पायी प्रवासी व सायकल वगळून) धर्मवीरनगर नाका येथे “प्रवेश बंद” करण्यात आल्याने ही वाहने धर्मवीरनगर नाका येथून सरळ पूर्व द्रुतगती महामार्गाने पुढे जातील.

तसेच पायलादेवी मंदिर प्रवेशद्वार पासून उपवन अ‍ॅम्पीथिएटर कडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना (पायी प्रवासी व सायकल वगळून) पायलादेवी मंदिर प्रवेशद्वार येथे डावीकडील मार्गिकेत “प्रवेश बंद” केला आहे. त्यामुळे या वाहनांना पायलादेवी मंदिर प्रवेशद्वार येथून उजव्या मार्गिकेतून अ‍ॅम्पीथिएटर कडे जावे लागणार आहे. याशिवाय कोकणी पाडा, बिरसा मुंडा चौक कडून हिरानंदानी मेडोज, डॉ. काशिनाथ घाणेकर चौक कडे पवारनगर नवीन रोडच्या डावीकडील एका वाहिनीवरून जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना (पायी प्रवासी व सायकल वगळून) प्रवेश बंद केल्याने ती वाहने बिरसा मुंडा चौक येथुन महाराजा अग्रसेन चौककडे जाणाच्या उजव्या मार्गिकेमधुन दुहेरी वाहतुकीने मार्गक्रमण करतील असे त्या अधिसुचनेत म्हटले आहे.

- Advertisement -

ही संकल्पना महापालिका आयुक्तांची आहे. तसेच मॉर्निंग वॉक हा ठाणेकर नागरिकांचा जिव्हाळ्याचा तसेच आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. त्यामुळे १ एप्रिल पासून सकाळी ०५:३० ते ०८:०० वाजण्याच्या दरम्यान ३० दिवसांच्या प्रायोगिक तत्वावर ही अधिसूचना लागू करण्यात येत आहे. याबाबत कोणाची काही एक हरकत असल्यास त्या लेखी स्वरूपात वाहतुक विभाग पोलीस उपायुक्त कार्यालयात पाठवाव्यात. याबाबत काही आक्षेप प्राप्त न झाल्यास ही अधिसुचना कायमस्वरूपी केली जाईल
– बाळासाहेब पाटील, उपायुक्त वाहतूक शाखा, ठाणे शहर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -