ठामपाचे पाचवे डायलेसीस केंद्र मुंब्रा येथे सुरू

अवघ्या 36 तासात घेतला 16 जणांनी लाभ

महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत तीन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मुंब्र्यातील डायलेसीस केंद्रात या सुविधेचा 16 रुग्णांनी लाभ घेतला आहे. पालिकेने ही सुविधा वार्षिक उत्पन्नाचे निकषावरून माफक दरात उपलब्ध करून दिली. त्यामुळे यापुढे मुंब्राकरांना या सेवेसाठी इतर ठिकाणी जाण्याचा त्रास कमी होणार आहे. ठाणे महापालिकेने काही वर्षांपुर्वी ठाणे, कळवा आणि मुंब्रा या सारख्या शहरांमध्ये पाच ठिकाणी स्वस्त दरात डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता.

यानुसार कोपरी, लोकमान्यनगर, कळवा रुग्णालय, घोडबंदरमधील पालिकेचे आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध झाल्यानंतर आता पाचव्या आणि शेवटचा मुंब्रा रुग्णालयात हे केंद्र तीन दिवसांपूर्वीच सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी डायलेसिस सुविधेसाठी आवश्यक असणारी 10 यंत्रे बसविण्यात आली आहेत. हे केंद्र ही खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्यात आली आहे. मात्र महापालिका प्रशासनाने त्या सेवेचे दर निश्चित करताना या सुविधेसाठी तीन प्रकारची वर्गवारी केले. त्यात ठामपा मध्ये राहणार्‍या नागरिकांपैकी ज्यांचे उत्पन्न वर्षांला एक लाखापेक्षा कमी आहे, अशांसाठी ही सेवा मोफत असणार आहे. तर ज्यांचे उत्पन्न क्रीमिलेअर मर्यादेपेक्षा कमी असेल अशा रुग्णांना प्रति डायलेसिस 500 रुपये तर या मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना 1000 रुपये दर आकारण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

मुंब्रा रुग्णालयाचे काम पुर्ण झालेले नसल्याने येथे ही सुविधा सुरु करण्यास विलंब होत होता. मात्र रुग्णालयाचे काम पुर्ण होताच या ठिकाणी ही सेवा तीन दिवसांपूर्वी सुरु करण्यात आली असून 16 जणांनी त्याचा लाभ ही घेतला आहे. त्या एक लाखापेक्षा कमी उत्त्पन्न असलेल्यांना ही सेवा मोफत दिली जाणार आहे.
– मनिष जोशी, उपायुक्त, ठामपा