ठाण्यात फेरीवाला धोरण होत नाही तोपर्यंत सर्वच फेरीवाल्यांवर कारवाई

अतिक्रमणावरील विषयाच्या बैठकीत निर्णय

Only 15 thousand 19 hawkers are eligible for Mumbai municipal corporation license

जोपर्यंत फेरीवाला धोरण होत नाही तोपर्यंत सर्वच फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या अतिक्रमणच्या बैठकीत घेण्यात आला आहे. रस्त्यावर एकही फेरीवाला बसणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या आहेत. मात्र, यामध्ये पालिकेनेच अधिकृत केलेल्या फेरीवाल्यांची कोंडी होत असून ताबा पावतीचे पैसे देऊनही अशा अधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेच्या वतीनेच फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी विलंब झाला असताना याचा फटका मात्र अधिकृत फेरीवाल्यांना बसत आहे.

शहरातील रस्ते आणि पदपथ घडविणार्‍या फेरीवाल्यांविरोधातही कारवाई सुरू आहे. या कारवाईदरम्यान सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ला फेरीवाल्याने केला असला तरी अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखण्यासाठीच हा हल्ला झाल्याचा दावा सहायक आयुक्त पिंपळे यांनी केला होता. याबाबत महापालिका सर्वसाधारण सभेत चर्चा झाली होती. मात्र, हल्ला झाल्याची घटना झाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील फेरीवाल्यांवर व्यापक स्वरूपात कारवाई करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर गणेशोत्सवात काही प्रमाणात ही कारवाई थंड झाली होती. बुधवारी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी अतिक्रमण विभागाची विशेष बैठक घेऊन जोपर्यंत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत सर्वच फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी या बैठकीत दिले आहेत.

ठाणे महापालिकेच्या वतीने २७८ फेरीवाल्यांना अधिकृत फेरीवाले ठरवले असून १०० फेरीवाल्यांना ठाणे महापालिकेच्या वतीनेच ओळखपत्र देण्यात आले आहे. याशिवाय १७८ फेरीवाल्यांना प्रभाग निहाय ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. दुसरीकडे आजही फेरीवाल्यांकडून ताबा पावतीच्या माध्यमातून फी वसुली केली जाते. एकीकडे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी पालिकेकडूनच होत नसून याचा भुर्दंड मात्र अधिकृत फेरीवाल्यांना बसत आहे.

महापालिका क्षेत्रात कोरोना काळात उभी राहिलेल्या बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करा आणि त्यासोबतच नवीन बेकायदा बांधकामे उभी राहू देऊ नका, अशा स्पष्ट सूचना महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी बुधवारी अतिक्रमण विभागाच्या बैठकीत दिल्या. तसेच बेकायदा बांधकामे आणि फेरीवाल्यांना अभय दिल्याचे आढळून आले तर संबंधित सहायक आयुक्तांसह इतर अधिकार्‍यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना काळात बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. या बांधकामाच्या मुद्यावरून टीका होऊ लागल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी अशा बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राजकीय दबाब झुगारून सातत्याने ही कारवाई सुरू आहे. त्यावेळेस फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले होते. त्यानुसार शहरात सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी आणि या कारवाईला गती देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी बुधवारी पालिकेत अतिक्रमण विभागाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सर्व सहायक आयुक्त, बिट निरीक्षक आणि अभियंते उपस्थित होते.महापालिका क्षेत्रात कोरोना काळात बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत, त्या बांधकामांवर कारवाई करा. कोणत्याही परिस्थितीत नवीन बेकायदा बांधकामे उभी राहणार नाहीत, याची खबरदारी घ्या, असे आदेश या बैठकीत देण्यात आले.