एसीपी कार्यालयासमोरच स्मार्ट फूटपाथवर शौचालय

बांधकाम थांबवण्याची मागणी

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका स्मार्ट सिटी अंतर्गत शहर सुंदर करण्याचे आयोजन करीत आहे. कल्याण विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाजवळ तसेच न्यायालयाच्या भिंतीलगत फुटपाथवर पैसे द्या, वापर करा या तत्त्वावर कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने दोन वर्षांपूर्वी एका सामाजिक संस्थेला मागणीनुसार शौचालय बांधण्याची परवानगी दिली होती. सुलभ शौचालय बांधण्याचे काम सुरू करण्यात आले असून काम तात्काळ थांबविण्याचे निवेदन नागरी हक्क संघर्ष समितीने पालिका आयुक्त व पोलिस उपायुक्त तसेच सहाय्यक पोलिस आयुक्तांना दिले आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या अंतर्गत शहराला सुंदर करण्यासाठी उपाययोजना आखत असतानाच नागरिकांसाठी चालण्याकरता बनविलेल्या फूटपाथावरची  जागा सुलभ शौचालय बांधण्यासाठी वापर करण्यात आली आहे. फुटपाथ आणि न्यायालयाच्या वॉल कंपाऊंड रहदारीच्या रस्त्यावर शौचालय उभे करण्यात येत असल्याने काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बांधण्यात येत असलेल्या शौचालय लगत न्यायालय तसेच एसीपी, वाहतूक एसीपी तसेच शहर वाहतूक शाखेचे कार्यालय आहे. दहा वर्षांपूर्वी याच जागेवर वादग्रस्त ठरविण्यात आलेल्या सुलभ शौचालय तोडण्यात आले होते. नागरिकांना चालण्यासाठी बनविलेला फूटपाथाची जागा घेण्यात आली असून शौचालयामुळे प्रचंड दुर्गंधी रस्त्यावर व परिसरात पसरणार असल्याचे कल्याण नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष बाबा रामटेके यांनी निवेदनात म्हटले आहे.

शौचालय बांधत असलेली जागा महत्वाची असून सुरक्षिततेच्या दृष्टीने उभे करण्यात येत असलेले शौचालय धोकादायक असल्याने शौचालयाचे काम त्वरित थांबविण्याची मागणी रामटेके यांनी पालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी , कल्याण विभागाचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

या शौचालयाचा बांधकाम संबंधात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा म्हणाले की, स्मार्ट सिटी अंतर्गत हे काम नाही. तर कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ म्हणाले की दोन वर्षापूर्वी एका सामाजिक संस्थेला शौचालय बांधण्यासाठी पैसे द्या व वापर करा, या तत्वावर परवानगी देण्यात आली.  मात्र या सामाजिक संस्थेकडे कोवीड कालावधीमध्ये पैसे उपलब्ध नसल्याने त्यांनी काम केले नव्हते. परंतु आता हे काम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे सुलभ शौचालयचे काम नागरिकांसाठी असल्याची पुष्टी त्यांनी लगावली.