घरठाणेविषारी रसायनिक द्रव्य टँकरद्वारे नाल्यात

विषारी रसायनिक द्रव्य टँकरद्वारे नाल्यात

Subscribe

वालधुनी नदीत विसर्जित होणार्‍या एका नाल्यात टँकरद्वारे विषारी रसायने टाकण्यात येत होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अंबरनाथ पोलिसांनी संयुक्त कारवाई करून हा टँकर ताब्यात घेऊन टँकरच्या मालकासह ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वालधुनी नदीत विसर्जित होणार्‍या एका नाल्यात टँकरद्वारे विषारी रसायने टाकण्यात येत होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अंबरनाथ पोलिसांनी संयुक्त कारवाई करून हा टँकर ताब्यात घेऊन टँकरच्या मालकासह ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वालधुनी नदी प्रदूषणाचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील सात आमदारांनी या संदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. यावेळी राज्यसरकारकडून उचित कारवाई होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाकडे फारसे लक्ष दिले नाही. रात्री किंवा पहाटेच्या सुमारास वालधुनी नदी किंवा या नदीला जोडणारे नाले यात विषारी रसायने रासायनिक कंपन्यांद्वारे किंवा टँकरद्वारे सोडले जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात जल व वायू प्रदूषण होते. अनेक वेळा विषारी वायू हवेत पसरल्याने नागरिकांना बाधा झाली आहे.

काल अंबरनाथ (प.) येथील मोरीवली एमआयडीसी परिसरात एमएच १२ एचडी १३२८ या टँकरमधून वालधुनी नदीत विसर्जित होणार्‍या एमआयडीसी जवळील नाल्यात विषारी रसायन सोडण्यात येत होते. यामुळे नाल्याच्या पाण्याचा रंग पूर्णपणे लालसर झाला होता. या संदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) चे उपअभियंता श्रीकांत भिंगे यांना माहिती मिळाली असती त्यांनी अंबरनाथ पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर अंबरनाथ पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळचे अधिकारी प्रमोद लोणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत प्रथम टँकर ताब्यात घेतला आणि टँकरचा मालक धीरज धुमाळ याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या टँकरमध्ये रसायन कोणत्या कंपनीतून आणले गेले. त्या कंपनीचा मालक, सुपरवायझर याचा पोलीस तपास करत आहेत.

- Advertisement -

टँकरचा मालक धीरज धुमाळ हा गेल्या अनेक वर्षांपासून टँकरचा व्यवसाय करत आहे. तो मोरीवली परिसरातच राहतो. पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तसेच टँकरमध्ये रसायन भरणारी कंपनी, कंपनीचा मालक, सुपरवायझर यांच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींविरुद्ध सार्वजनिक उपद्रव, रोगराई पसरविणे, प्रदूषण करणे आदी कलमांप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

या संदर्भात अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांना विचारले असता ते म्हणाले की, या प्रकरणात आम्ही मुख्य आरोपी धीरज धुमाळ याला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

मुंबईत होम क्वारंटाइन नागरिकांची संख्या लाखोंच्या घरात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -