आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

तब्बल 41 रिक्षा चालकांना दंड

उल्हासनगर शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शेकडो रिक्षांवर आरटीओ आणि वाहतूक पोलीस यांनी संयुक्त कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 41 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. अरुंद रस्ते असलेल्या उल्हासनगर शहरातील रस्त्यांवर बेकायदेशीर रिक्षा मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या भीषण झाली आहे. याबाबत उल्हासनगर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय गायकवाड यांनी कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी तानाजी चव्हाण यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्या आधारे मंगळवारी आरटीओ पोलीस निरीक्षक अनिल धात्रक, पोलीस उप निरीक्षक इंद्रजित मदने, सुरजितसिंग चव्हाण यांचे पथक उल्हासनगर मध्ये आले होते.

या पथकाने शहाड फाटक, 17 सेक्शन, नेहरू चौक या तीन ठिकाणी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय गायकवाड, पोलीस उप निरीक्षक संदीप इगडे, जगदीश मोक्कल, अंमलदार मच्छिन्द्र माळी, अमोल कांबळे, प्रकाश जाधव, नितेश अरज, गोकुळ गोंघडे, संतोष डोहाळे, मंगेश कंटेवार, विकास मोरे यांच्या सह जवळपास 150 रिक्षांच्या कागदपत्रांची छाननी केली. यावेळी 41 रिक्षाचालकांनी आरटीओ नियमांचे उल्लंघन केले असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या सुमारे 2,79,000 रुपयांच्या दंड पावत्या आरटीओ पोलीस निरीक्षक अनिल धात्रक यांनी फाडल्या.