कोपरी पूलावरची वाहतूक १४ तास राहणार बंद

इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करा

Transportation on Kopari bridge will be closed for 14 hours
कोपरी पूलावरची वाहतूक १४ तास राहणार बंद

ठाण्यातील विकासकामांना गती मिळाली आहे. ठाण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी प्रमुख पूल ठरणाऱ्या कोपरी पुलाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होत आले आहे. कोपरी पूलावरील पहिल्या टप्प्यातील गर्डर लाँन्चिंगचे काम करण्यासाठी १६ आणि १७ तारखेच्या रात्री वाहतूक पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे आणि मुंबईला जोडणाऱ्या जुन्या कोपरी पुलाला पर्याय ठरणाऱ्या नव्या कोपरी पुलाचे काम वेगात सुरु आहे. या पुलावर लोखंडी गर्डर लाँचिंगचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे एमएमआरडीएने कोपरी पूलावरील वाहतूक शनिवारी आणि रविवारी पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या जुन्या कोपरी पुलावर मोठी क्रेन उभी करुन हे काम करण्यात येणार आहे. यासाठी १४ तास ठाण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. या कालावधीत वाहन चालकांनी आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन करणारी अधिसूचनाही ठाणे वाहतूक शाखेकडून जारी करण्यात आली आहे.

ठाण्यातील जुना कोपरी पूल जीर्ण होत आला आहे. यामुळे त्या पुलाच्या शेजारी दोन्ही बाजूस नव्या पुलाचे काम सुरु आहे. या पुलाचे लोखंडी गर्डर पालघर येथे सुरु होते. या गर्डरचे काम पूर्ण झाले असून हा गर्डर पुलावर बसविण्यात येणार आहे. गर्डर बसविण्याचे काम १६ जानेवारीला उशीरा रात्री ११ वाजता सुरु होणार असून १७ जानेवारी पहाटे ६ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. तसेच १७ जानेवारीला १७ जानेवारी रात्री ११ ते १८ जानेवारी पहाटे ६ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईकडून ठाण्याकडे ये-जा करण्यासाठी सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल. त्यामुळे प्रवाशांना आपल्या इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी पर्यायी मर्ग देण्यात आले आहेत.

नाशिक मुंबई महामार्गावरुन ठाण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहणांनाही पर्यायी मार्ग दिला आहे. ह्या वाहणांची मार्गिका खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळवण्यात आली आहे. खारेगाव टोलनाक्याहून डावीकडे वळण घेऊन गँमन चौक-पारसिक रेती बंदर- मुंब्रा बायपास- शीळफाट्याहून उजवीकडे वळण घेऊन म्हापेमार्गे रबाळे-एरोली उड्डाणपुल मार्गे मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली आहेत.

हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून नाशिक आणि घोडबंदर रोडने तसेच, ठाणे शहरांतून मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या हलक्या वाहनांना नौपाडा सर्व्हिस रोड महालक्ष्मी मंदिरासमोरून कोपरी ब्रिजकडे जाण्यासाठी प्रवेश बंद केला आहे. ही वाहने साकेत कट डावीकडे वळण घेतील. कळवा-विटावा-ऐरोलीमार्गे मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाने इच्छित स्थळी जातील.