घरठाणेश्रीनिवास खळे ग्रंथसंग्रहालयाचे दोन मजले नागरिकांसाठी

श्रीनिवास खळे ग्रंथसंग्रहालयाचे दोन मजले नागरिकांसाठी

Subscribe

नगरसेवक विकास रेपाळे यांच्या पाठपुराव्याला यश

वागळे इस्टेट विभागातील हाजुरी येथील श्रीनिवास खळे ग्रंथसंग्रहालय इमारतीमध्ये दोन मजल्यावर नागरिकांसाठी बहुउद्देशीय सभागृह तयार करण्यात यावे, असा ठराव करण्यात आला असून याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दिले.

याबाबत स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे यांनी प्रस्ताव मांडला होता, त्यावर सर्वंकष अशी चर्चा होवून गटनेते दिलीप बारटक्के यांनी या ठरावास अनुमोदन दिले. हाजुरी या ठिकाणी ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या नावाने महापालिकेने इमारत उभारली आहे. या वास्तूमध्ये तळ अधिक तीन मजल्यावर असून आजवर पहिल्या आणि दुसर्‍या मजल्यावर प्राच्य विद्या संस्थेस जागा उपलब्ध करुन दिली आहे. सन 2014 मध्ये संस्थेस शाहू मार्केट येथील इमारत धोकादायक झाल्याने श्रीनिवास खळे ग्रंथसंग्रहालयातील पहिला आणि दुसरा मजला उपलब्ध करुन देण्यात आला, परंतु याबाबत महासभेची परवानगी घेतल्याची कोणतीही नोंद महापालिकेकडे नसल्याचे नगरसेवक विकास रेपाळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

- Advertisement -

या वास्तूमध्ये महापालिकेच्या नावाचा साधा उल्लेख करण्यात आलेला नसतानाही या संस्थेला दरवर्षी महापालिकेकडून पाच लाख रुपये देखील देण्यात येत आहेत. वास्ताविक पाहता ही इमारत महापालिकेने बांधलेली असताना देखील याकडे दुर्लक्ष होत आहे, तसेच उपलब्ध जागेच्या फक्त 20 टक्के जागाच या संस्थेच्या मार्फत वापरली जात असून उर्वरित जागेचा काही वापर होत नसल्याची बाब देखील नगरसेवक विकास रेपाळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

याबाबत सर्वसाधारण सभेत सभागृहाचे लक्ष वेधून या वास्तूतील केवळ तिसरा मजला हा प्राच्य विद्या संस्थेस द्यावा, उर्वरित दोन मजले विभागातील स्थानिक नागरिकांसाठी बहुउद्देशीय सभागृह म्हणून वापरण्यात यावे अशी सूचना स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे यांनी मांडली, याला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली असून हा प्रस्ताव मंजूर केल्याची घोषणा पीठासीन अधिकारी म्हणून महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी केली. यापुढे या वास्तूतील दोन मजले नागरिकांसाठी वापरण्यात येतील असेही महापौरांनी नमूद केले. या इमारतीतील जागा नागरिकांना उपलब्ध व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत होती. याबाबत ठोस निर्णय झाल्याबाबत स्थानिक नागरिकांच्यावतीने नगरसेवक विकास रेपाळे संपूर्ण सभागृहाचे आणि महापौर नरेश म्हस्के यांचे आभार व्यक्त केले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -