घरठाणेठाण्यात दोन चिमुरड्या मित्रांचा खड्डयात बुडून मृत्यू

ठाण्यात दोन चिमुरड्या मित्रांचा खड्डयात बुडून मृत्यू

Subscribe

शिवाई नगर येथील मिलिटरी ग्राउंडच्या आवारात असलेल्या खड्ड्यात अवकाळी पावसामुळे साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपवन येथील रहिवासी असलेल्या अभिषेक बाबू शर्मा आणि कृष्णा मनोज गौड या अकरा वर्षीय चिमुरड्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी समोर आली. ते दोघे मित्र असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या घटनेमुळे ठाणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

अभिषेक हा उपवन,रामबाग येथील दुर्गा चाळ आणि कृष्णा हा कृष्णा चाळीतील रहिवासी आहे. येऊरच्या पायथ्याशी असलेल्या मिलिटरी ग्राउंडच्या आवारात केलेल्या खोदकामामुळे मोठे खड्डे झाले आहेत. त्यातच दोन-तीन दिवसांपूर्वी ठाण्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे त्या खड्ड्यात पाणी साचल्याने तेथे हे दोघे रविवारी पोहण्यासाठी गेले होते.

- Advertisement -

त्यावेळी, पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे बुडाले. अशी माहिती तेथे खेळण्यासाठी गेलेल्या काही मुलांनी ते पाहून पोलिसांना ही बातमी दिली. त्यानुसार वर्तकनगर पोलीस, अग्निशमन दल आणि ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. त्या दोघांचे मृतदेह बाहेर काढून वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच ते दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -