घरठाणेदांडी बहाद्दर वाहकांमुळे टीमटीला दररोज दोन लाखांचा भुर्दंड

दांडी बहाद्दर वाहकांमुळे टीमटीला दररोज दोन लाखांचा भुर्दंड

Subscribe

ठाणे परिवहन सेवेत वाहकांची कमतरता असल्याने मागील पंधरा दिवसापासून दररोज सुमारे 30 बस विविध आगरात उभ्या आहेत. परिणामी परिवहन सेवेला दिवसाला साधारण दोन लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे. याचा विचार करता मागील वीस दिवसात सुमारे 40 लाखांच्या आसपास परिवहन सेवेचे आर्थिक नुकसान झाले आहे. दांडी मारणारे वाहक आणि कंत्राट पद्धतीने होणार्‍या नवीन वाहकांच्या भरतीला अदयाप मंजुरी मिळाली नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. ठाणे परिवहन सेवेत वांरवांर दिर्घकालीन रजेवर असलेल्या चालक, वाहक यांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे सुट्टी घेणार्‍या कर्मचार्‍यांना जो दंड बजावण्यात येतो. त्याची रक्कमही कमी आहे. परिणामी दांडी मारून कर्मचारी ती रक्कम भरण्यास अधिक प्राधान्य देतात. यापूर्वी ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी 2010 च्या सुमारासदांडीबहदर 51 कर्मचारी आणि कार्यशाळेतील 14 अशा एकूण 65 जणांना बडतर्फ करण्याची कारवाई केली होती.

परिवहनच्या ताफ्यात आजच्या घडीला 658 वाहकआणि 410 चालक आहेत. तर शंभरच्या आसपास वाहक मागील दोन वर्षात निवृत्त झाले आहेत. मात्र दिर्घ कालीन रजेवरील वाहकांची संख्या आणि दांडीबहाद्दर चालकांची संख्या याचा फटका परिवहन सेवेला बसत आहे. त्यातील दिर्घ कालीन म्हणजेच तीन महिन्याहून अधिक काळ गैरहजर राहणारे कर्मचारी यांचा यात समावेश होतो. तसेच दरवर्षी काही वाहक हे निवृत्त देखील होत असतात. त्यानेही वाहकांची संख्या कमी होते, या सर्व बाबीचा फटका ठाणे परिवहन सेवेच्या उत्पन्नावर होत आहे. वाहक कामावरच येत नसल्याने मागील पंधरा दिवसापासून सुमारे 25 ते 30 बस या विविध आगारामध्ये उभ्या राहत आहेत. यातील एका बसचे दिवसाचे उत्पन्न हे सुमारे सात ते आठ हजार रुपये इतके आहे. याचा विचार करता दिवसाला सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान केवळ दांडीबहाद्दर वाहकांपायी परिवहन सेवेला सहन करावे लागते. त्यातच ठाणे परिवहन सेवेत कंत्राटी पद्धतीने 400 हून अधिक वाहकांची भरती केली जाणार आहे. त्याची निविदा ही निघाली मात्र त्याला अद्याप मंजुरी नसल्याने ती ही रखडली गेली. परिणामी ठाणे परिवहन सेवेत सध्या मोठ्या प्रमाणावर वाहकांची कमतरता भासत असल्याची माहिती विश्व्सनीय सूत्रांनी दिली. याबाबत ठाणे परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांनी या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले की मागील पंधरा दिवसापासून वाहकांच्या कमतरते पायी किमान 20 बस दिवसाला आगरात उभ्या असतात. त्याने परिवहन ला आर्थिक नुकसान ही सहन करावे लागत आहे.

- Advertisement -

बस रस्त्यावर कशा आणाव्यात?
ठाणे परिवहन सेवेत नुकत्याच दाखल झालेल्या साध्या 10 इलेक्ट्रिक बस मंगळवारपासून सुरु करण्यात येणार आहेत. या बस यापूर्वीच्या जुन्या मार्गांवरच चालणार आहेत. ठाणे परिवहन सेवेत इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. पण यातील काही बस वाहक नसल्याने त्या रस्त्यावर कशा उतराव्याच्या हा प्रश्न परिवहन प्रशासनापुढे आहे. महत्वाचे म्हणजे 400 हून अधिक कंत्राटी वाहक परिवहनच्या सेवेत घेण्याबाबत जून महिन्यापासून प्रयत्न सुरु आहेत. पण ठाणे महापालिकेत कार्यरत असलेले काही ‘झारीतील शुक्राचार्य’ यात अडथळा आणत असल्याची कुजबुज परिवहनच्या वर्तुळात होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -