उल्हासनगर । काही महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्तपदी रुजू झालेले विकास ढाकणे यांची अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपसचिवपदी नियुक्ती झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. नवीन आयुक्तपदी अंबरनाथचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चेने उधाण आले आहे.
उल्हासनगर महापालिका आयुक्तपदी विकास ढाकणे यांची गेल्या ऑगस्ट महिन्यात नियुक्ती झाल्यावर, त्यांनी महापालिका प्रशासनावर फक्त ४ महिन्यात चांगली पकड निर्माण केली होती. तसेच खुल्या जागेत आणि रस्त्याच्या बाजूच्या हरितपट्टा तयार करणे, अवैध बांधकामे नियमित करणे, धोकादायक इमारतीचा प्रश्न शासनकडे लावून धरून आयुक्त आणि महापौर बंगल्याला प्राधान्य दिले. नवीन महापालिका इमारतीचा आराखडा मंजूर करून घेतला, महापालिकेची स्वतःची पाणी पुरावठा योजना प्रस्तावासाठी पाठपुरावा केला. तसेच विविध विकास कामावर लक्ष केंद्रित केले होते. मात्र अचानक त्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपसचिवपदी नियुक्ती झाल्याने सर्वाना आश्चर्यचा धक्का बसला आहे. नवीन आयुक्त पदासाठी अंबरनाथ पालिकेचे प्रशासक डॉ प्रशांत रसाळ तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.