दिवाळीच्या सणात निघालेल्या निर्माल्यामुळे उल्हासनगर समवेत इतर शहराला पाणी पुरवठा करणारी उल्हासनदी पूर्णतः प्रदूषित झाल्याने एमआयडीसीला पाणी उपसा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. उल्हासनगर कल्याण समवेत ठाण्यातील अनेक शहरांना पाणी पुरवठा करणारी उल्हास नदीत गेल्या काही दिवसांपासून दिवाळीचा कचरा खासकरून दीपावलीच्या पूजेसाठी वापरण्यात आलेले फुले, हार समवेत अन्य साहित्य नदीत टाकण्यात आल्याने मोहना धरणाजवळ हा सर्व कचरा जमा झाला. त्यामुळे नदी पूर्णतः प्रदूषित झाली आहे. नदीत हा सर्व कचरा टाकल्याने नदीतील मासे आणि अन्य जीव नष्ट होत आहेत. या नद्यांचे पाणी वापरण्यायोग्य राहिलेले नाही.
उल्हास नदी संवर्धन समितीचे रवि लिंगायत आणि वालधुनी नदी बिरादरीचे अध्यक्ष शशीकांत दायमा यांनी प्रदूषण नियंत्रण विभाग आणि महानगरपालिका प्रशासन यांच्याकडे तक्रार केली आहे. या नदीत साचलेला कचरा तातडीने साफ करण्यात यावा, या कचर्यामुळे नदी पूर्णतः प्रदूषित झालेली आहे. नदीतील केरकचरा ताबडतोड काढण्यात आला नाही तर प्रदूषित झालेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे तक्रारीत म्हटले आहे. याविषयी दायमा यांनी सांगितले की, नागरिकांनी दिवाळी सण साजरा करताना घरातील पूजेचा सर्व कचरा नदीत सोडल्याने उल्हास नदी आणि वालधुनी नदी प्रदूषित झालेली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उल्हासनगर महानगरपालिकेने त्वरित दोन्ही नदीचा कचरा साफ करून नदी ला स्वच्छ करण्याची मोहिम राबवली पाहिजे. उल्हास नदीकाठी होणार्या छठ पूजेचा कार्यक्रमावर पालिकेने लक्ष ठेवले आहे. नदीत कचरा होऊ नये याची दक्षता घेण्याची गरज आहे.