उल्हासनगर । उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर या शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी पहाटे उल्हासनगरच्या कॅम्प नंबर चारच्या व्हीनस चौक भागात एका मद्यधुंद कारचालकाने भरधाव गाडी चालवत पाच जणांना धडक दिली. या अपघातात कार चालकासह चार जण जबर जखमी झाले आहेत. जखमींवर मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथील विनस चौकात मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास हा कार चालक व्हीनस चौक परिसरातून आपली कार भरधाव वेगाने घेऊन जात होता. त्याने रस्त्यातून जाणार्या आटो रिक्षा चालक दत्ता मोरे आणि दुचाकी चालक दीपक पाटकर यांच्या समवेत काही जणांना जोरदार धडक दिली. हा कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाल्याची माहिती जखमींनी दिली. यातील दोघांवर खासगी तर दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात कार चालक तन्वीर भावसार आणि त्याचा मित्र मोहित जैन हे दोघे जबर जखमी झाले आहेत. या कार दुर्घटनेत कारचा चक्काचूर झाला. कारचालक आणि त्याचा मित्र उल्हासनगरातील डान्सबारमध्ये पहाटेपर्यंत मद्यपान करत होते. त्यानंतर त्यांनी कार चालवून नागरिकांना धडक दिली. विठ्ठलवाडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.