उल्हासनगर । उल्हासनगरात बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करणार्या बोगस डॉक्टरांच्या विरोधात उल्हासनगर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने मोहिम सुरू केली आहे. शहरातील झोपडपट्टी भागात बेकायदा दवाखाने उघडून रुग्णांवर उपचार करणार्यांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने २६बोगस डॉक्टरांची यादी तयार केली आहे. त्यांच्या प्रमाणपत्रांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मोहिनी धर्मा यांनी दिली.
या बेकायदा दवाखान्यातून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याविषयीचे पत्र महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमियोपॅथीचे प्रबंधक डॉ कैलास सोनमनकर यांनी उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाला पाठवून कारवाईची सूचना केली होती. त्यानुसार पालिकेच्या आरोग्य अधिकारी मोहिनी धर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सत्यम गुप्ता, डॉ मोनिका जाधव यांच्या पथकाने कॅम्प नंबर चार येथील महादेव नगरमधील महादेव हेल्थ केयर सेंटरमध्ये अचानक धाड मारून बनावट रुग्ण उपचारासाठी पाठवून या दवाखान्यात बेकायदा उपचार करणार्या डॉ प्रदीप कचवानी, डॉ संदीप कचवानी आणि डॉ जयदीप कचवानी यांच्या प्रमाण पत्रांची पडताळणी केली. ही प्रमाणपत्रे बोगस असल्याचे आढळून आले.
वरील सर्व डॉक्टर इलेक्ट्रोपॅथी तसेच क्रॉसपॅथीक असताना हे सर्वजण अॅलोपॅथीचे उपचार करीत असल्याचे या वेळी आढळून आले. मनपाच्या आरोग्य विभागाने केलेल्या तक्रारीवरून संबंधित तीनही डॉक्टरांविरुद्ध विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी सांगितले कि संबंधित तीनही डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांची चौकशी सुरू आहे.