उल्हासनगर । उल्हासनगर महापालिकेतील मालमत्ताकर विभागात वशिलेबाजीने कामाला लागलेले काही कर्मचारी यांना कोणताचा अनुभव नसल्याने तसेच कामचुकार प्रवृत्तीमुळे मालमत्ता करात कमालीची घट होत आहे. त्यामुळे मनपा आयुक्त विकास ढाकणे यांनी मालमत्ताकर वसुलीत वाढ होण्यासाठी तसेच विभागात काम पारदर्शक व्हावे याकरता अनुभवी हुशार कर्मचारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेच्या सर्व इच्छुक कर्मचार्यांना प्रशिक्षण देवून त्यांची परीक्षा घेऊन गुणवत्तेप्रमाणे कर्मचार्यांना घेण्याचे निश्चित केले आहे. आयुक्तांच्या या निर्णयमुळे अनुभवहीन आणि कामचुकार कर्मचार्यांना मोठा दणका बसणार आहे.
उल्हासनगर महापालिकेचे एकमेव आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ताकर विभागात गेली अनेक दशकांपासून मोठ्या प्रमाणात घोळ आहे. शहरात १लाख ८० हजार मालमत्ता आहेत. त्या प्रमाणे वर्षाला १५० कोटींपेक्षा अधिक कर वसुली अपेक्षित असताना एप्रिलपासून आतापर्यंत ६४ कोटींची वसुली झाली आहे. त्यात लागू करण्यात आलेल्या दोन अभय योजनेत ३० कोटींच्या वसुलीचा समावेश आहे. येत्या चार महिन्यात हा आकडा १४० कोटीपर्यंत गाठण्याचा निर्धार मनपा आयुक्त ढाकणे यांनी केला आहे. त्यासाठी मालमत्ता कर विभागात अनुभवी आणि हुशार कर्मचार्यांची निवड केली जात आहे. त्यासाठी कर्मचार्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या विद्यमान कर्मचार्यांना काहीच येत नाही अशा वशिलेबाजांना विभागातून हलवण्यात येणार आहे.
या निवडीसाठी कर्मचार्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा घेण्याचे पत्रक आयुक्तांनी काढले आहे. यामुळे गुणवत्ता असलेले हुशार कर्मचारी आपल्या प्रयत्नाने परिक्षेतून यश संपादन करून या विभागात नियुक्ती मिळवू शकतात. यासाठी ही परीक्षा ५ डिसेंबर आणि २०डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. दरम्यान ५ डिसेंबर रोजी परीक्षेसाठी विशेष प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन देण्यात येणार आहे. १० डिसेंबर रोजी मालमत्ताकर चाचणी विषयी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत ५० टक्के गुण मिळवणार्या कर्मचार्याना कर आकारणी आणि कर संकलन विभागात काम देण्यात येणार आहे. ज्यांना या विभागाचा अनुभव नाही, त्या कर्मचार्याना दुसर्या विभागात पाठवण्यात येणार आहे. मालमत्ता कर विभागात बर्याच वर्षापासून तेच कर्मचारी कार्यरत असल्याने करवसुली होत नाही. त्यामुळे आयुक्तांनी कर वसुलीवर अधिक भर देत हा निर्णय घेतला आहे.