उल्हासनगरात क्रिकेट वर्ल्ड कप सामन्यावर सट्टा खेळताना आणि पत्त्याचा जुगार खेळविताना उल्हासनगर पोलिसांनी चार बुकींना अटक केली आहे. सर्व बुकी क्रिकेट सामन्यावर सट्टा आणि पत्त्याचा जुगार चालवत होते. पोलिसांनी गोल मैदान येथील पॉली हिल बिल्डींगमध्ये छापा मारुन या बुकींच्या मुसक्या आवळल्या आहेत. उल्हासनगर शहर क्रिकेट बेटिंग आणि बुकींसाठी कुप्रसिद्ध आहे. याच शहरातील नामांकित क्रिकेट बुकी असलेला अनिल जयसिंगानी याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापर्यंत जाण्याची मजल मारली होती.
उल्हासनगरात मोठ्या प्रमाणात क्रिकेट बेटिंग खेळली जाते. या क्रिकेट बेटिंगच्या नादात शेकडो व्यापारी देशोधडीला लागले आहेत. नुकेतच हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्रिकेट बेटिंग करताना चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना गुरुवारी रात्री उल्हासनगर कँप नंबर दोन येथील गोल मैदान परिसरात असलेल्या पॉली हिल बिल्डींगमध्ये काही क्रिकेट बुकी सामन्यांवर सट्टा लावत होते. पोलिसांनी घातलेल्या छाप्यात राम ताराचंद नागदे,दिपक मजनुमल मनवानी, श्यामलाल मथुरादास मालदानी, वासुदेव गोपीचंद नालवानी या चार जणांना क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणार्या आणि पत्त्याचा जुगार चालवताना पोलिसांनी पकडले. या प्रकरणाचा तपास पोलीस उप निरीक्षक राहुल पाटील करीत आहेत.