घरठाणेठाण्यातील  ४७ हजार २९८ मुलांचे लसीकरण पूर्ण

ठाण्यातील  ४७ हजार २९८ मुलांचे लसीकरण पूर्ण

Subscribe

मुलांचा लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे महापालिका हद्दीत ३ जानेवारीपासून आजपर्यंत १५ ते १८ वयोगटातील ४७ हजार २९८ मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ठाणे महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर मुलांचा लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महापौर नरेश म्हस्के दररोज शहरातील लसीकरण केंद्रावर भेटी देवून मुलांच्या लसीकरणाचा आढावा घेत आहेत, जास्तीत जास्त मुलांनी लसीकरण करुन स्वत:ला सुरक्षित ठेवावे, तसेच लसीकरणानंतरही मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात वारंवार स्वच्छ धुणे या त्रिसूत्रींचे पालन करावे असे आवाहन त्यांनी १५ ते १८ वयोगटातील मुलांना केले असून लसीकरणास पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक देखील केले आहे.३ जानेवारी २०२२ पासून शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरूवात झाली.

त्यानुसार ठाणे महापालिका हद्दीत मुलांच्या लसीकरणाकरिता शाळा, महाविद्यालय, महापालिकेची आरोग्यकेंद्रे अशा २९ लसीकरण केंद्रावर मुलांचे लसीकरण सुरू आहे. पहिल्याच दिवसापासून लसीकरणांसाठी मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले. लसीकरणाबाबत होत असलेली जनजागृती आणि आपणच आपल्याला सुरक्षित ठेवावे याची जाणीव या किशोरवयीन मुलांना असल्याचे नमूद करीत महापौरांनी लसीकरणासाठी येणाऱ्या मुलांचे कौतुक केले.

- Advertisement -

ठाणे महापालिका हद्दीत विविध लसीकरण केंद्रावर होत असलेल्या १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा आढावा घेतला असता, आजपर्यंत ४७ हजार २९८ मुलांचे लसीकरण पूर्ण झाले असून दिवसेंदिवस लसीकरणासाठी मुलांची संख्या वाढत आहे. ३ ते ११ जानेवारी या कालावधीत ठाणे शहरात  हा लसीकरणाचा आकडा हा समाधानकारक असून लवकरच १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण ठाणे शहर पूर्ण करेल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे. तसेच या लसीकरणासाठी मेहनत घेत असलेले ठाणे महापालिकेचे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, परिचारिका यांचे देखील महापौरांनी कौतुक केले आहे.

दुसरा डोस विहित मुदतीत घ्यावा
सद्यस्थितीत ९ वीपर्यतच्या शाळा व ११ वी चे वर्ग १५ फेब्रुवारीपर्यत बंद आहेत, त्यामुळे या कालावधीत १५ ते १८ वयोगटातील मुलांनी जास्तीत जास्त लसीकरण करुन घ्यावे, तसेच लसीकरणाचा दुसरा डोस देखील विहित मुदतीत घ्यावा असे आवाहनही महापौरांनी ठाणेकरांना केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -