साताऱ्यातील दरे गावातून आल्यापासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील आपल्या निवासस्थानी आहेत. एकनाथ शिंदे यांनी सगळ्या बैठका रद्द केल्या असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. शिंदे गटातील आमदार एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील निवासस्थानी जात आहेत. यातच शिवसेनेचे ( शिंदे गट ) आमदार, माजी मंत्री विजय शिवतारे हेही शिंदेंना भेटण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी त्यांची गाडी अडवल्यानं ते चांगलेच भडकले.
एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावात विश्रांतीसाठी गेले होते. पण, तिथे गेल्यावर त्यांची प्रकृती बिघडली होती. यानंतर ते रविवारी ( 1 डिसेंबर ) ठाण्यात आले आहेत. मात्र, सोमवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरांनी शिंदेंना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा : अजितदादांचा शरद पवार अन् ठाकरेंना धक्का! तीन बडे नेते अन् माजी आमदार गळाला?
त्यामुळे माजी मंत्री विजय शिवतारे हे शिंदेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ठाण्यातील निवासस्थानी गेले होते. यावेळी निवासस्थानाच्या गेटवर पोलिसांनी शिवतारे यांची गाडी अडवली. तेव्हा, “तुम्हाला आमदार आणि माजी मंत्री ओळखता येत नाही का?” असा सवाल उपस्थित करत शिवतारेंनी पोलिसांना खडसावलं आहे.
नेमकं घडलं काय?
विजय शिवतारेंची गाडी निवासस्थानाच्या गेटवर आल्यावर पोलिसांनी ती अडवली. यावेळी गाडी अडवणाऱ्या पोलिसांना म्हणाले की, “किती वर्षे झाले पोलीस खात्यात काम करत आहात? माजी मंत्री आणि आमदार तुम्हाला ओळखता येत नाहीत का?”
तेव्हा, एका पोलिसानं म्हटलं, ‘गाडी माहीत नव्हती.’ त्यावर शिवतारे म्हणाले, “माझी गाडी अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. प्रत्येकवेळी गाडी अडवायची, हे बरोबर नाही…”
भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवतारेंनी सांगितलं, “दोन दिवस मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना ताप आला होता. ते रविवारी दरेगावातून मुंबईत आले. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आलो होतो, अजूनही ते उपचार घेत आहेत. श्रीकांत शिंदे यांची भेट झाली. आता एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी आहे.”
हेही वाचा : लागोपाठ तीन प्रश्न अन् उत्तर देताना जरांगे-पाटलांचा संताप; म्हणाले, “अरे काय बोलता राव, कुठून…”