ठामपा सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या होणार प्रसिद्ध

महापालिका आयुक्तांची माहिती

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या १६ जुलै, २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून नागरिकांना ठाणे महापालिकेच्या प्रभागांच्या अंतिम मतदार याद्या www.thanecity.gov.in या वेबसाईटवर आणि निवडणूक विभाग ( मुख्यालय ) आणि सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे पाहण्यासाठी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शुक्रवारी दिली आहे.

 राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली ५ जानेवारी, २०२२ ते ३१ मे, २०२२ पर्यंत अद्ययावत केलेली विधान सभा क्रमांक १४४ कल्याण ग्रामीण, १४६ ओवळा – माजिवडा, १४७ कोपरी पाचपाखाडी, १४८ ठाणे , १४९ मुंब्रा – कळवा या सर्व विधानसभा मतदार संघाच्या ठाणे महानगरपालिका हद्दीतील मतदार यादी प्रभाग निहाय विभागून ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रारूप प्रभाग मतदार याद्या २३ जून, २०२२ रोजी ठाणे महानगरपालिका मुख्य कार्यालय व संबंधित प्रभाग समिती कार्यालय, ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर तसेच स्थानिक वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. त्यावर दिनांक २३ जून, २०२२ ते ०३ जुलै, २०२२ या कालावधीत नागरिकांकडून हरकती सूचना मागविण्यात आल्या होत्या.

या विहित कालावधीत प्रारूप मतदार यादीवर प्रभानिहाय प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तपासणी करून निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व संबंधीत पदनिर्देशित अधिकारी तथा उपआयुक्त , ठाणे महानगरपालिका , ठाणे यांनी प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम केली आहे. प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ७ ( अ ) अन्वये सर्व संबंधित पदनिर्देशित अधिकारी यांनी तयार करुन अधिप्रमाणित केलेल्या प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या दिनांक १६ जुलै,२०२२ रोजी माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहेत .

         प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर आणि निवडणूक विभाग ( मुख्यालय ) आणि सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे कार्यालयीन वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन ठेवण्यात येणार आहेत. तसेच मतदार याद्या महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्र, तळमजला येथे आगाऊ मागणी नोंदविल्यास कार्यालयीन वेळेत विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातील.