कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद

 कल्याण, डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये देखभाल दुरुस्तीची कामे करावयाची असल्याने या कामासाठी येत्या मंगळवारी (ता.१४) कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांचा पाणी पुरवठा सकाळी नऊ ते रात्रो नऊ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली. कल्याण, डोंबिवली शहरांना उल्हास नदी काठच्या बारावे, मोहिली, नेतिवली, टिटवाळा जलशुध्दीकरकण केंद्र आणि मोहने येथील उदंचन केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. या केंद्रांमध्ये विद्युत, यांत्रिकी देखभाल दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने मंगळवारी या चारही जलशुध्दीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम, टिटवाळा परिसरातील नागरिकांनी एक दिवसाचा पुरेसा पाणी साठा घरात करुन ठेवावा. मंगळवारी दुरुस्तीचे काम होणार असल्याने बुधवारी काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असते. तरी नागरिकांनी मुंबलक पाणी साठा करुन दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता मोरे यांनी केले आहे.