यापुढे आम्हाला शिंदे गट नाही शिवसेना म्हणा

ठाण्याच्या मध्यवर्ती कार्यालयातून काढले पत्रक

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण पक्ष हे चिन्ह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला दिले. त्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने यापुढे शिंदे गट असे न संबोधता आम्हाला शिवसेना म्हणा असेच काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. हे पत्रक शिवसेना पक्षाचे सचिव संजय भाऊराव मोरे यांच्या स्वाक्षरीने जाहीर केले असून त्या पत्रकावर ठाण्यातील आनंद आश्रम मध्यवर्ती कार्यालय असे म्हटले आहे.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर पक्षात ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले. त्यामुळे पक्षावर दावा करण्याकरता दोन्ही गट आघाडीवर होते. आम्हीच मूळ पक्ष आहोत असे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले. तर, बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आम्हीच आहोत असे म्हणत शिंदे गटानेही शिवसेना पक्षावर दावा केला. त्यामुळे हे प्रकरण निवडणूक आयोगाच्या दरबारी गेले.

ऑगस्ट महिन्यापासून निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण प्रलंबित होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोवर निवडणूक आयोगाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. परंतु, ही स्थगितीही कालांतराने सर्वोच्च न्यायालयाने उठवली. त्यामुळे निवडणूक आयोगाकडेही सुनावणी सुरू झाली. दोन्ही गटांची बाजू ऐकून झाल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल केव्हा येणार याची प्रतीक्षा असतानाच निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारीला सायंकाळी निकाल जाहीर केला. शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण पक्ष चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले. त्यानुसार शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला. सर्वाधिक आमदार आणि खासदार शिंदे गटाकडे असल्याने खरी शिवसेना शिंदे गट असल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला. याचदरम्यान आनंद आश्रम या ठाण्याच्या मध्यवर्ती कार्यालयातून एक प्रसिद्धीपत्रक २१ फेब्रुवारी रोजी काढण्यात आला आहे. त्यामध्ये आम्हाला शिंदे गट न संबोधता शिवसेना म्हणा, अशी विनंती या पत्राद्वारे प्रसारमाध्यमांना केली आहे.