एका शिपिंग कंपनीत व्यवस्थापक म्हणून नोकरी करणाऱ्या एका २६ वर्षीय पतीचे युक्रेनमध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. पत्नीने विरोध करूनही पती पत्नीला न सांगता प्रेयसीच्या भेटीसाठी युक्रेनला गेला. ही माहिती कळल्यावर २५ वर्षीय पत्नीने आत्महत्या केली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पतीवर पत्नीच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना युक्रेनमधून परतलेल्या आरोपी पतीला पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. नितीश नायर असे अटक आरोपी पतीचे नाव आहे. तो कल्याण येथील काटेमानिवली परिसरात राहतो.
मृत महिलेचे वडील यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे, आरोपी नितीशवर मृत मुलीचे प्रेम होते. दोघांचा प्रेमविवाह तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. सप्टेंबर महिन्यात मृत पत्नीला माहिती मिळाली की आपला पती नितीशचे युक्रेनमधील एका महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. मृत पत्नीसह कुटुंबीयांनी या प्रेमाला विरोध केला होता. युक्रेनला न जाण्याचा इशारा पतीला दिला होता.
८ नोव्हेंबरला नितीशने आपल्या पत्नीला सांगितले की, तो काही कामासाठी मुंबई मध्ये बीकेसी येथील त्याच्या कार्यालयात जात आहे. त्याऐवजी तो युक्रेनला गेला. त्याने पत्नीला मोबाईलवर लघु संदेश पाठवला की, मी युक्रेनला पोहोचलो असून मी परत येणार नाही. तू मला विसरून जा, यामुळे पत्नी नैराश्यात गेली., १० नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या दिवशी तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या पूर्वी काही तिने मैत्रिणींना लघु संदेश पाठवून आत्महत्या करणार असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी तिचा पती नितीश मायदेशी परतला. परत आल्याची माहिती मिळताच त्याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली.