घरठाणेमहिलांच्या योजनांना निधी नाही, गाड्यांसाठी निधी आला कुठून? - नगरसेविका मृणाल पेंडसे

महिलांच्या योजनांना निधी नाही, गाड्यांसाठी निधी आला कुठून? – नगरसेविका मृणाल पेंडसे

Subscribe

महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती, प्रभाग समिती सभापती यांना नवीन वाहने खरेदीसाठी ७० लाखांचा चुराडा करण्यासाठी निधी कसा मिळाला, असा सवाल भाजपच्या महिला अध्यक्षा तथा नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी उपस्थित केला आहे.

कोरोनामुळे पालिकेच्या उत्पन्नावर जसा परिणाम झाला तसाच शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विधवा आदींसह इतर व्याधी असलेल्या महिलांना देखील घराचा गाडा आखताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या योजनांचा या महिलांना फायदा मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु त्या निधीला देखील पालिकेने कात्री लावली आहे. परंतु दुसरीकडे महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती, प्रभाग समिती सभापती यांना नवीन वाहने खरेदीसाठी ७० लाखांचा चुराडा करण्यासाठी निधी कसा मिळाला, असा सवाल भाजपच्या महिला अध्यक्षा तथा नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी उपस्थित केला आहे.

एकीकडे कोरोनामुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांच्या हालाखीची परिस्थिती झाली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने पालिकेने या महिलांना त्यांच्या योजनांच्या माध्यमातून सहकार्य करणे गरजेचे आहे. परंतु तसे न करता गाड्या खरेदीचा घाट घातला जात आहे. गाड्या खरेदी करण्यासाठी पालिकेकडे जर निधी असेल तर समाजातील या गरीब, दुर्बल महिलांसाठी जो निधी कमी करण्यात आलेला आहे. तो निधी देखील पूर्णपणे या महिलांच्या हाती द्यावा, अशी मागणी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे
– मृणाल पेंडसे, महिला शहर अध्यक्ष, भाजप

- Advertisement -

महापालिका हद्दीत मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाची साथ सुरु झाली. ही साथ रोखण्यासाठी लॉकडाऊन घेण्यात आला. त्यामुळे पालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर देखील याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावरही याचे पडसाद उमटल्याचे दिसून आले आहे. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ ठेवण्यासाठी प्रशासनाने काटकसरीचा अर्थसंकल्प सादर केला असून यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प १२०० कोटी रुपयांनी कमी झाला आहे. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना प्रशासनाची दमछाक होत असल्याचे महापालिकेकडून सांगितले जात आहे. परंतु असे असतांना ५-२-२ खाली गाड्या खरेदी करण्याची घाई मात्र सुरु आहे. अत्यावश्यक असलेल्या कामांचा ५-२-२ खाली  समावेश केला जातो. मात्र वाहन खरेदी अत्यावश्यक कामात कशी मोडते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

 

- Advertisement -

‘जनाची नाही, तर मनाची तरी…’

कोरोना संकटाच्या काळात खर्चात काटकसर गरजेची असताना नव्या कार खरेदीची हौस असलेल्या महापौर नरेश म्हस्के यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी ‘जनाची नाही, तर मनाची लाज तरी बाळगून’ कार खरेदीचा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे. महापौर नरेश म्हस्के यांना १९ लाख ६७ हजार रुपयांची ह्युंदाई एलंत्रा, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृहनेते अशोक वैती, स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांना प्रत्येकी दहा लाख ९३ हजारांची होंडा सिटी, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीचे सभापती भूषण भोईर, वर्तकनगर प्रभाग समितीच्या सभापती राधिका फाटक आणि महिला-बालकल्याण समितीच्या सभापती राधाबाई जाधवर यांना स्विफ्ट डिझायर दिली जाणार आहे. त्याची एकत्रित किंमत १८ लाख ४५ हजार रुपये आहे. एकिकडे महापालिकेच्या अर्थसंकल्पात तब्बल १२०० कोटी रुपयांची कपात झाली आहे नगरसेवकांचा निधी, दिव्यांग व विधवा महिलांना अनुदान आदीच्या खर्चात कपात झाली. अशा परिस्थितीत ठाणेकर जनता अडचणीत असताना, महापौर व पदाधिकाऱ्यांना ७० लाख रुपयांच्या गाड्या खरेदीचा हट्ट का? विशेष म्हणजे संबंधित पदाधिकाऱ्यांनी नवे वाहन मिळविण्यासाठी विनंती केली आहे, ही बाब अत्यंत दुर्दैवाची आहे. यापूर्वीची वाहने केवळ तीन ते चार वर्षांपूर्वीच खरेदी केली आहेत, ती सुस्थितीत असल्याने नव्या गाड्यांची हौस का?, असा सवाल नगरसेवक वाघुले यांनी केला आहे. कोरोना काळात सामान्य ठाणेकर आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत मालमत्ता करात सवलत नाकारण्यात सत्ताधारी व महापौर नरेश म्हस्के आघाडीवर होते. अशावेळी स्वतःला गाड्या घेताना पालिकेला पडणाऱ्या आर्थिक फटक्याचे भान महापौरांना नाही का, असा टोलाही संजय वाघुले यांनी लगावला आहे.

हेही वाचा –

दहावी, बारावीची परीक्षा होणार ऑफलाईन, परीक्षा केंद्रावर द्यावा लागणार पेपर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -