माणकोली-मोठागाव ठाकुर्ली खाडीपुलाचे काम 85 टक्के पूर्ण

येत्या एप्रिल अखेरपर्यंत पुलाचे काम पूर्णत्वास

माणकोली ते मोठागाव ठाकुर्ली जोडणार्‍या खाडी पुलाची गेल्या दीड दशकापासून चर्चा सुरु आहे. साडे सहा वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करीत भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र भूसंपादनाचे काम व पर्यावरण विभागाच्या परवानगी अभावी हा प्रकल्प रखडला गेला.अवघ्या तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र आतापर्यंत तब्बल साडे सहा वर्षे या प्रकल्पाला झाली आहेत. कालपर्यंत या प्रकल्पाचे काम 85 टक्के पूर्ण झाले असून आजही 15 टक्के काम शिल्लक आहे. एप्रिल अखेर पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी दिली.

एमएमआरडीएमार्फत या पुलाचे काम करण्यात येत असून जून 2016 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भिवंडी लोकसभा मतदार संघातील माणकोली येथे या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी हा शासकीय कार्यक्रम भाजपाने हायजॅक केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. तर भाजपाच्या खेळीला काटशह देण्यासाठी शिवसेनेने त्या कार्यक्रमाच्या आधी कल्याण लोकसभा मतदार संघातील डोंबिवली मोठागाव ठाकुर्ली येथे प्रतीकात्मक भूमिपूजन उरकले होते. खाडीच्या अलीकडे भाजपाचे तर खाडीच्या पलीकडे शिवसेनेचे खासदार असताना या पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी त्यावेळी शिवसेना-भाजपामध्ये जणू स्पर्धाच लागली होती.

डोंबिवलीतील मोठागाव ते भिवंडीतील मानकोली पर्यंतच्या खाडी पुलाचे काम सुरु करण्यापूर्वी दोन्ही बाजूच्या जमिनिनाचे भूसंपादन व पर्यावरण विभागाची मंजुरी मिळविणे गरजेचे होते. मात्र डोंबिवली पश्चिमेला थेट खाडी पर्यंत रस्ता असल्याने केवळ सीआरआरझेड क्षेत्रातील जमिनीचे भूसंपादन करावे लागले. या ठिकाणी प्रत्यक्ष पुलाच्या उभारणीचे काम देखील सुरु झाले. या उलट ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी या पुलाचे भूमिपूजन केले,तेथील भूसंपादन प्रक्रियेला स्थानिक शेतकर्‍यांनी विरोध केला. परिणामी भूसंपादन प्रक्रिया रखडल्याने माणकोली भागात प्रत्यक्ष काम रखडले होते. आज मात्र भिवंडी कडील भागातील काम जलद गतीने पूर्णत्वास गेल्याचे दिसत आहे.

सुमारे 223 कोटी 25 लाख रुपये खर्चाच्या सहापदरी असलेल्या या पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी 3 वर्षांची मुदत देण्यात आली होती, मात्र निर्धारित वेळेत पुलाचे काम पूर्ण करण्यात अपयश आले आहे. सध्या डोंबिवली येथून ठाण्याला ये-जा करण्यासाठी कल्याण किंवा मुंब्रा मार्गे जावे लागते. या दोन्ही मार्गांमुळे वेळ व इंधन अधिक प्रमाणात खर्च होत आहे.अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हा पूल पूर्ण झाल्यावर डोंबिवलीतून ठाणे गाठण्यासाठी अवघ्या 20 मिनिटांचा अवधी कालावधी लागणार असल्याने हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. मंगळवारी एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही.आर श्रीनिवास यांनी याप्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी पत्रकारांसोबत या प्रकल्पाची पाहणी केली .या प्रकल्पाचे 85 टक्के काम पूर्ण झाले असून येत्या एप्रिल अखेर काम पूर्ण होईल,अशी माहिती म्हात्रे यांनी यावेळी दिली.