ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या मार्गिकेचे काम पूर्ण

 सहाव्या मार्गिकेसाठी ७२ तासांचा मेगाब्लॉक, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती  

गेल्या १४ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते दिवा दरम्यानच्या पाचव्या मार्गीकेचे काम रविवारी पूर्ण झाले आहे. सहाव्या मार्गिकेचे काम देखील फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात पूर्ण होणार आहे. पाचवी आणि सहावी मार्गिका  कार्यान्वित झाल्यानंतर रेल्वे प्रवाशांना प्रवास विनाअडथळा, अधिक जलद आणि सुखकारक होणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

कल्याण ते ठाणे या दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका टाकण्याच्या कामाची घोषणा २००७ मध्ये झाली होती. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात २०१४ नंतरच झाली. या मार्गीकेसाठी पर्यावरण विभागाच्या परवानग्या आणि इतर बाबींमुळे कामाला विलंब झाला. ठाण्यापलिकडील कल्याण, कर्जत, कसारा पर्यंतच्या प्रवाशांची दिवसेंदिवस गर्दी वाढत होती.
या मार्गावर असलेली रेल्वे फाटके यामुळे रेल्वे सेवेला ब्रेक लागत होता. जादा गाड्या वाढविण्यात अनेक अडचणी येत होत्या. परिणामी उपनगरी रेल्वेवर प्रवाशांचा मोठा ताण पडत होता. त्यामुळे पाचवी आणि सहावी मार्गिका टाकण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने रेल्वे प्रशासन व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत होते.

तो दिवस रेल्वेसाठी आणि प्रवाशांसाठी ऐतिहासिक
ठाणे-दिवा मार्गावरील पाचवी आणि सहावी लाईन टाकण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लागोपाठ मेगा ब्लॉक घेऊन कामे करीत आहे. आता पाचवी लाईन टाकल्यामुळे पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. सहावी लाईन टाकण्यासाठी ४  ते  ६  फेब्रुवारी दरम्यान ७२  तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ज्यावेळी सहावी मार्गिका कार्यान्वित होईल, तो दिवस रेल्वेसाठी आणि प्रवाशांसाठी ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. धीम्या आणि जलद लोकलसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार आहे. तसेच मेल एक्सप्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार आहे. या मार्गात आता रेल्वे फाटकांच्या जागी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास आता विना अडथळा, अधिक जलद आणि सुखकारक होणार असल्याचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.