उल्हासनगरात लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

clashesh between shinde group and bjp leader in kedgaon ahmednagar

उल्हासनगर कॅम्प एक येथील शहाड फाटक जवळ असलेल्या शाहु महाराज कॉलनीत राहत असलेल्या लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात पाटा घालून त्याची हत्या केल्याची घटना घडली. या घटनेने शहाड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उल्हासनगर पोलिसांनी काही तासातच लहान भावाला अटक करून गजाआड घातले आहे.
शहाड फाटक जवळ शाहु महाराज कॉलनीत अमित रमेश गांगुर्डे आणि रोहित रमेश गांगुर्डे हे दोघे भाऊ राहत होते. यांचे वडील रमेश गांगुर्डे हे ऑर्डनस फॅक्टरीत कामाला असल्याने ते फॅक्टरीच्या बॅरेकमध्ये राहत आहेत. दरम्यान आज दुपारी अमित व रोहित मध्ये वाद विवाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात अमित याने रोहित याच्या डोक्यात पाटा घालून त्याची हत्या केली.

हा प्रकार पोलिसांना समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रोहितच्या मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला. दरम्यान पोलिसानी अमित रमेश गांगुर्डेला ताबडतोब ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याची शक्यता पोलिसानी वर्तवली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस आयुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहाय्यक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे करीत आहेत.