टिकटॉकवर व्हिडीओ टाकणे पडले महागात

तरुणांना बसस्थानकात मारहाण

एका कपड्याच्या दुकानात व्हिडीओ बनवून तो टिकटाॅकवर टाकला म्हणून दोन तरुणांना आणि त्यांना वाचवण्यासाठी गेलेला असे तिघांना  देवगांव मुरबाड येथील तिघांनी  मुरबाड बसस्थानकात  बोलावून सर्वासमोर  अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. हा प्रकार अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस चौकी समोर घडला. मात्र मारहाण करणा-यांच्या दहशतीमुळे त्या तरुणांनी पोलिस ठाण्यात जाण्याचे टाळले. या गंभीर घटनेची कोणत्याही सामाजिक संघटनेने दखल न घेतल्याने अखेर काही सुज्ञ नागरिकांच्या पुढाकाराने मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरबाड येथील नमस्कार मॅरेज हाॅल येथे कपड्यांचा सेल लावण्यात आला होता. या ठिकाणी दोन महिला कपड्यांची पाहणी करीत होत्या. तर तालुक्यातील नारिवली येथील  दोन तरुण त्या महिलांना कपडे दाखवत असल्याचा व्हिडीओ बनवून तो टिकटाॅकवर शेअर केला. या व्हिडीओत एका चित्रपटातील डायलाॅग बोलला जात असल्याचे दाखवले आहे. परंतू मुरबाड शेजारील देवगांव येथील कचरु टेकडे, विठ्ठल टेकडे आणि विशाल टेकडे यांना हा व्हिडीओ  आक्षेपार्ह असल्याचे समजून त्यांनी नारिवली येथील या तरुणांना मुरबाड बस स्थानकात गाठून बेदम अमानुष मारहाण केली. त्यांना उठाबशा काढायला लावल्या, त्याचा व्हिडीओ तयार करुन तो व्हायरल केला. यामुळे ते तरुण भयभित झाले होते. त्यामुळे दोन दिवस होऊन देखील ते पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास जात नव्हते. परंतू नारिवली येथील या तरुणांना काही सुज्ञ नागरिकांनी आधार देऊन अखेर त्यांना मुरबाड पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार देण्यात आली.

ही घटना तीन हात नाका पोलीस चौकी समोर घडली. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होऊन देखील मुरबाड पोलीस अथवा कोणत्याही सामाजिक संघटनेने याची दखल न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या घटनेची दखल मुरबाड पोलिसांनी घेण्यास उशीर लावल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मुरबाड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रसाद पांंढरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना बेड्या ठोकल्या. या पुढे कोणीही कायदा हातात घेऊ नये, सार्वजनिक ठिकाणी गदारोळ, अमानुष मारहाण करू नये, एवढेच नसून स्थानिक नागरिकांकडून धंद्यावाल्यांकडून हप्ते वसुली करणे, त्यांना दमदाटी करण्याचा प्रकार निदर्शनास आल्यास त्यांची गय केली जाणार नाही.

नागरिकांनी अशा कोणत्याही धमक्यांना बळी न जाता आपली रितसर तक्रार मुरबाड पोलीस स्टेशन येथे दाखल केल्यास त्यांंच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करणार असल्याचे यावेळी सांगितले. तर तरुणांना मारहाण करणारे कचरु टेकडे, विठ्ठल टेकडे व विशाल टेकडे या  आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली आहे.  तर या आरोपीवर कलम 367 ब नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे आण्णा साळवे, दिनेश उघडे आणि कैलास देसले यांनी मुरबाड पोलिसांना केली असता त्यांनी दिलेली तक्रार पोलिसांनी घेण्यास नकार दिला असल्याचे आण्णा साळवे यांनी सांगितले.