‘कोमसाप’च्या प्रत्येक शाखेत युवाशक्ती समिती कार्यरत व्हावी! – प्रा. प्रदीप ढवळ

सध्याची युवा पिढी ही नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून प्रगल्भ होत आहे. त्यांच्या नव्या विचारांना चालना देण्यासाठी कोमसापच्या केंद्रीय शाखेबरोबरच प्रत्येक शहर शाखेने युवाशक्ती समिती कार्यान्वित करावी, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी केले. कोमसापचे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन कोरोना निर्बंधांमुळे पुढे ढकलावे लागले, या पार्श्वभूमीवर आयोजित कोमसापच्या सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या सभेला कोमसापचे ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळा कांदळकर, ठाणे शहर अध्यक्ष संगीता कुलकर्णी यांच्यासह उल्हासनगर, कल्याण येथील शाखेचे पदाधिकारी आणि ठाणे शहर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कोमसापच्या ठाणे शहराच्या नव्या कार्यकारणी नियुक्तीनंतर झालेल्या पहिल्याच सभेला संबोधित करताना डॉ. ढवळ यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासूनच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच प्रत्येक शाखेने दर्जेदार कार्यक्रम आयोजित करताना युवाशक्तीला प्रोत्साहित करावे, असे सांगितले. कोमसापच्या जुन्याजाणत्या पदाधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान करावा, असा सल्लाही डॉ. ढवळ यांनी दिला.
यावेळी कोमसापचे ठाणे जिल्हाध्यक्ष बाळा कांदळकर यांनी पुढील नियोजनासाठी मार्गदर्शन केले. ठाणे जिल्ह्यातील कोमसापच्या प्रत्येक शाखेने उत्तम कार्यक्रम राबवावेत, तसेच जिल्हा शाखा आणि केंद्र शाखा त्यांच्या कायम सोबत उभी राहील, अशा शब्दांत कांदळकर यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.
यावेळी ठाणे शहर कार्यकारिणी सदस्य जयश्री देसाई यांची महाराष्ट्र राज्य मराठी भाषा सल्लागार समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते करण्यात आला. कोमसापच्या शहराध्यक्ष संगीता कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले.
साहित्य-संस्कृतीसाठी संवाद हवा!
कोरोनाकाळात दुरावलेली मने स्थिरस्थावर होत असतानाच पुन्हा तिसऱ्या लाटेचे सावट आले आहे. त्यामुळे कोमसापचे युवा साहित्य संमेलनही पुढे ढकलावे लागले. परंतु कोरोनाविषयक सर्व निर्बंध पाळून, अनेक माध्यमांतून कोमसापच्या साहित्यिक-सांस्कृतिक चळवळीने एकमेकांशी संवाद साधला पाहिजे.
– बाळा कांदळकर, ठाणे जिल्हाध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद